आमदार निवास बलात्कार प्रकरणातील पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

file photo
file photo

नागपूर: नागपूरमधील आमदार निवासात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने शुक्रवारी (ता. 21) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी आज (शनिवार) दिली.

ठाकरे यांनी सांगितले की, 'पीडित मुलगी प्रचंड तणावाखाली आहे. शिवाय, संशयित आरोपीच्या ओळखीच्या लोकांनी पीडित मुलीच्या कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. यामुळे नैराष्य आलेल्या मुलीने शुक्रवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने यामधून ती वाचली आहे.'

दरम्यान, येथील आमदार निवासात एका अल्पवयीन मुलीवर सराफ व्यावसायिक आणि त्याच्या मित्राने सलग तीन दिवस सामूहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे आमदार निवास हे "व्यभिचारा'चे केंद्र झाले असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सराफ व्यावसायिक मनोज विनोद भगत (वय 45) आणि रजत तेजलाल मद्रे (वय 19) यांना अटक केली आहे. आरोपींना 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 
पीडित मुलगी 17 वर्षांची असून, दीड वर्षापासून ती मुख्य आरोपी मनोज भगतच्या दुकानात विक्रेती म्हणून काम करत होती. वेतन वाढवून देण्याचे आमिष दाखवून मनोज तिच्याशी लगट करायचा. मार्च महिन्यात तिचे वेतन त्याने वाढवले होते. त्यासाठी बाहेर फिरायला जाण्याची अट त्याने ठेवली होती. भोपाळला एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात आहे, असे तिच्या घरी खोटे सांगून मनोज 14 एप्रिलला तिला घेऊन गेला. मात्र, भोपाळला न जाता मनोजने तिला मित्र रजत मद्रे याच्या खोलीवर नेले. तेथे दारू पिल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी लॉंग ड्राइव्हवर नेऊन येथील काटोल रोडवरील जंगलात कार उभी करून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. रात्री आठ वाजता ते आमदार निवासात आले. तेथे आधीच आरक्षित करून ठेवलेल्या तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 320 मध्ये नेले. रात्री दहा वाजताच्या सुमारास रजत मद्रेसुद्धा तेथे आला. आमदार निवासात दोन दिवस रजत आणि विनोद यांनी तिच्यावर अत्याचार केला.

घटना अशी उघडकीस आली...
आमदार निवासात दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर 17 एप्रिलला सकाळी संबंधित मुलीला मनोजने घरी सोडून दिले. त्यानंतर दुपारी पुन्हा तिच्या घरी येऊन सोबत चलण्यास म्हटले. मात्र, तिने नकार दिला. या वेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मनोजने तिच्या आईला "ही भोपाळला आली नव्हती, ती कुठे गेली होती विचारा', असे सांगितले. तो निघून गेल्यानंतर मुलगी घाबरली आणि तिने घरातून पळ काढला. तिच्या आईने पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेतला आणि मोबाईल लोकेशन घेतले. त्या वेळी काटोल रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला शोधून चौकशी केली आणि तिने दिलेल्या माहितीवरून आरोपींना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com