नोटा बदलण्यापूर्वी कोणालाही कळविले नाही: नायडू

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यापूर्वी काही सहकाऱ्यांना कळविल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे.

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यापूर्वी काही सहकाऱ्यांना कळविल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना याबाबत कळविले होते असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले, 'नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर काही विरोधी पक्ष द्वेषयुक्त प्रचार करत आहेत. गरीबांच्या फायद्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.' तसेच हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारने त्यांच्या काही सहकाऱ्यांना याबाबत कळविल्याचा आरोपही त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. दहशतवाद्यांना निधी पुरविण्यासाठी आणि काळे पैसे जमा करण्यासाठी अधिक किंमतीच्या नोटांचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी नोटा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

तेच तेच लोक पुन्हा पुन्हा बॅंका आणि एटीएम्समध्ये येत असल्याने गर्दी कमी होत नसल्याचे केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी आज स्पष्ट केले. तसेच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पैसे बदलून घेणाऱ्यांच्या बोटांवर शाई लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.