मोदी-शहादेखील करणार उपवास ! 

Amit Shah, Narendra Modi
Amit Shah, Narendra Modi

नवी दिल्ली : कॉंग्रेस व विरोधकांनी गोंधळ करून संसद अधिवेशन एक दिवसही चालू न दिल्याच्या निषेधार्थ सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार, आमदार व पदाधिकारी येत्या 12 एप्रिलला एका दिवसाचा उपवास करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा हेही या सत्याग्रह आंदोलनात सक्रिय सहभाग देतील. पक्षाध्यक्ष शहा हे हुबळी येथे धरणे आंदोलनात सहभागी होतील. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बोलताना "पंतप्रधानांसह सारे भाजप कार्यकर्ते खरे सत्याग्रही व सच्चाग्रही आहेत. त्यामुळे भाजपच्या उपवासाची तुलनाच कोणाशी होऊ शकत नाही,'' असा टोला कॉंग्रेसला उद्देशून लगावला. 

पक्षनेतृत्वाने संसद अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या भाजप संसदीय बैठकीत 12 एप्रिलला उपवास करण्याची सूचना खासदारांना केली होती. याचे तपशील आता देण्यात येत आहेत. कॉंग्रेससह विरोधकांचा संसद बंद पाडण्याचा पवित्रा हा लोकशाहीविरोधी असून त्याविरुद्ध भाजप उपवास करेल, असे पक्षाने म्हटले आहे. भाजपचे आंदोलन हे "छोले भटोरे आंदोलन' नसेल तर तो खराखुरा सत्याग्रह किंवा आत्मक्‍लेशाचा मार्ग असेल, असा चिमटा पक्षाने कॉंग्रेसला काढला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसने दलितांवरील अन्यायाचे कारण सांगून दिल्लीत राजघाटावर जो उपवास केला त्याचा फियास्को झाल्याने भाजपने चांगलीच फिरकी घेतली होती. पक्षाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षांसह अरविंदर सिंह लवली, हारून यूसुफ आदी नेते उपोषणापूर्वी छोले भटोऱ्यांवर ताव मारताना छायाचित्रे व्हायरल झाल्याने कॉंग्रेसचा हा उपवास प्रचंड चेष्टेचा विषय ठरला होता. या प्रकरणानंतर भाजप प्रस्तावित उपवासाबद्दल अधिक सावध झाला आहे. 

पंतप्रधान कार्यालयात मोदींचा उपवास 
कर्नाटकच्या रणधुमाळीत व्यग्र असेलेले जावडेकर म्हणाले, की येत्या 12 तारखेला भाजप खासदार कॉंग्रेसने संसद ठप्प पाडल्याचा निषेध म्हणून एका दिवसाचा उपवास करतील. मोदी हे असे नेते आहेत की नवरात्रीनिमित्त केलेल्या उपवासात ते आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या व कामकाज तेवढ्याच तडफेने पार पाडतात. उपवासाच्या काळातही मोदी 100 तासांमध्ये 50 कार्यक्रम करतात. पक्षाचे प्रवक्ते, खासदार नरसिंह राव म्हणाले, की पंतप्रधानही आपल्या कार्यालयातून या उपवास आंदोलनात सहभागी होतील. या दिवशी राज्यसभेचे भाजप खासदार देशभरात फिरून कॉंग्रेसच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा पर्दाफाश करतील. अमित शहा हुबळी येथील आंदोलनात सहभागी होतील. संसद ठप्प पाडल्याच्या निषेधार्थ 23 दिवसांच्या कामकाजाचे वेतन न घेण्याचा निर्णय भाजप खासदारांनी यापूर्वीच घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com