Ghulam Nabi Azad & Narendra Modi
Ghulam Nabi Azad & Narendra Modi

विरोधकांचे विनोद आणि पंतप्रधानांची रूक्षता!

नवी दिल्ली - राष्ट्रपतींचे अभिभाषण संपल्यानंतर काहीशा सैलावलेल्या वातावरणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हास्यविनोदाचे वावडे असल्याचे आज दिसून आले. त्यांच्या या रूक्षतेमुळे कॉंग्रेसचे नेते भांबावून गेले आणि "कुठून विनोद करायला गेलो' असे त्यांना वाटू लागले! 

राष्ट्रपतींचे अत्यंत लांबलचक असे भाषण संपले आणि तो सोहळा संपल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होत असते. तोपर्यंत सदस्य हे नेहमीप्रमाणे संसदेच्या आवारात गप्पा मारत वेळ काढत असतात. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि उपनेते आनंद शर्मा हेही एका कोपऱ्यात उभे राहून गप्पा मारत होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात "सर्जिकल स्ट्राइक'चा उल्लेख आल्यानंतर पंतप्रधानांनी विशेष जोरदारपणे बाकावर थापा मारल्या आणि अगदी जोरजोराने मारल्या, असे आझाद सांगत असतानाच मनमोहनसिंग यांनी त्यांच्या बाजूनेच साक्षात मोदी येत असल्याचे सांगितले. 

पंतप्रधान येत असल्याचे पाहून या नेत्यांनी गप्पा थांबवून आदबीने त्यांना नमस्कार केले. मोदींनीही हस्तांदोलन करून शिष्टाचार पाळला. वातावरण अनौपचारिक असल्याचे पाहून आझाद यांना राहवले नाही आणि त्यांनी सहजपणे मोदींना म्हटले, "सर्जिकल स्ट्राइकच्या उल्लेखाच्या वेळी तुम्ही विशेष जोरदारपणे बाकावर थापा दिल्याचे मी यांना सांगत होतो!' त्यावर मोदीही हसले. पण आजाद यांना विनोद करण्याची हुक्की आली असावी आणि त्यांनी पुस्ती जोडत मोदींना म्हटले, "तुम्ही इतक्‍या जोरात बाक वाजवत होतात की मला वाटले आता तो तुटेल!' 

हा अत्यंत अनौपचारिक संभाषणातला विनोद होता. परंतु बहुधा मोदींना तो रुचला नसावा. अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, देहबोली बदलली आणि छाती व खादे ताठ करीत त्यांनी काहीशा जरबेच्या स्वरात म्हटले, "और भी बहुत कुछ तोडना बाकी है!' आणि त्यांच्या नेहमीच्या शैलीत दोन्ही हातांचे तळवे जोरात एकमेकांवर आपटून "नमस्कार' म्हणून निघून गेले. 

तो कठोर प्रतिसाद पाहून आजाद यांना तर चक्क पाण्यात पडल्यासारखे झाले आणि कुठून आपण विनोद करायला गेलो आणि झाले काय, असे त्यांना वाटल्याचे हा प्रसंग पाहणाऱ्यांनी सांगितले. 

परंतु, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वेळचे दृश्‍यही पाहण्यासारखे होते. सर्जिकल स्ट्राइकच्या उल्लेखाच्या वेळी मोदींनी ज्या दमदारपणे बाक वाजविला, त्या वेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या चेहऱ्यावरची रेषदेखील हलली नाही. बाक न वाजवता ते हाताची घडी घालून बसून राहिले. नोटाबदलीच्या उल्लेखाच्या वेळी देखील मोदींनी जोरदारपणे बाक बडवला तेव्हा जेटली यांनी उपचार केल्यासारखे दोनदाच बाकावर हात आपटून आखडता घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com