अविश्वास प्रस्ताव फेटाळला; मोदी सरकार जिंकले

NoConfidenceMotion
NoConfidenceMotion

नवी दिल्ली, ता. 20 ः सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी आघाडीतील संख्याबळातील प्रचंड तफावतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्ध मोठा गाजावाजा करून विरोधकांनी आणलेला अविश्‍वास ठराव आज अपेक्षेप्रमाणे फुसका बार ठरला. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोमदार भाषण करीत सरकारवर टीकास्त्र सोडले; पण ठरावाला उत्तर देताना मोदी यांनी राहुल यांच्या आरोपांच्या चिंध्या करताना सरकारची बाजू समर्थपणे मांडत राहुल यांच्या आरोपांमधील हवाच काढून घेतली. अविश्‍वास ठरावाच्या बाजूने 126 तर विरोधात 325 मते मिळाली. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने, तसेच ओडिशातील बिजू जनता दलाने तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली होती. 

पराभवाची जाणीव असल्यामुळे, संख्याबळ नव्हे तर अविश्‍वास ठरावाची कारणे महत्त्वाची असल्याची पलायनवादी भूमिका विरोधकांनी कालपासूनच घेतली होती. तथापि, सर्व विरोधी पक्षांच्या मदतीने आगामी निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करू, असा दावा करून राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

तत्पूर्वी, तेलुगू देसम पक्षाचे नेते जयदेव गाला यांनी अविश्वासदर्शक ठराव लोकसभेत मांडला. आंध्र प्रदेशातील प्रश्न हे राष्ट्रीय प्रश्न नाहीत, असा समज असेल तर तो चुकीचा आहे, अशी सुरवात त्यांनी केली. सत्ताधारी मोदी सरकारने आंध्र प्रदेशला दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला जात नसेल, तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्नही त्यांनी विचारला. 
कॉंग्रेसतर्फे बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रावर चौफेर टीका केली. "स्वतःला देशाचा चौकीदार म्हणविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार नव्हे तर भागीदार आहेत,' अशा घणाघाती शब्दांत त्यांनी तोफ डागली. तसेच सर्व विरोधी पक्ष आणि सत्ताधारी बाकांवरील लोकांच्या मदतीने येत्या निवडणुकांमध्ये मोदींचा पराभव करू, अशी घोषणाही त्यांनी केली. 

...जीभ घसरली 
अविश्वासदर्शक ठरावावरील चर्चेच्यावेळी पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल यांची जीभ घसरली. "मोदीजी बाहर जाते है' ऐवजी राहुल यांनी "मोदीजी बार में जाते है' असे वक्तव्य केले. हे ऐकताच सभागृहात हशा पिकला. पंतप्रधानांनाही हसू आवरले नाही. झालेली गडबड राहुल यांच्या लक्षात आली व त्यांनी लगेच "मोदीजी बाहर जाते है, मगर उससे देश को फायदा नहीं होता,' असे वाक्‍य सावरून घेतले. 

आरएसएस, भाजपचा आभारी 
हिंदू असणे काय आहे, भारतीय असणे काय आहे, या देशाची संस्कृती काय आहे, देशाचा इतिहास काय हे तुमच्यामुळे मी शिकलो. त्यामुळे पंतप्रधान, आरएसएस व भाजपचा मी आभारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

राहुल म्हणाले... 
- चीन सरकार 24 तासांत 50 युवकांना रोजगार देते, केंद्राने 24 तासांत किमान 400 जणांना तरी नोकरी द्यावी 
- पंतप्रधान हे देशाचे चौकीदार नाहीत तर भागीदार आहेत. 
- पंतप्रधान माझ्या डोळ्याला डोळे भिडवू शकत नाहीत 
- सगळ्या भाजपवासीयांना कॉंग्रेसमय करणार 

पंतप्रधान उवाच... 
- ही सरकारवरील अविश्‍वासाची परीक्षा नाही, तर कॉंग्रेस आणि त्यांच्या कथित मित्र पक्षांची "शक्ती परीक्षा' आहे. 
- मी भागीदार आहे, चौकीदारही आहे, पण ठेकेदार वा सौदागर नाही 
- डोळ्यांचा वापर कसा करतात हे देशाने गळाभेटीनंतर पाहिले 
- अहंकारातूनच आला अविश्‍वास ठराव 
- तुम्ही नामदार, आम्ही कामगार 
- आम्ही मतपेढी किंवा लांगूलचालनाचे राजकारण करत नाही 
- सर्जिकल स्ट्राइक्‍सचा उल्लेख "जुमला स्ट्रइक' असा करणे म्हणजे सुरक्षा दलांचा अपमान. 
- देशात अस्थैर्य निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसने अविश्‍वास ठरावाचा उपयोग केला. 
- राफेल करार पारदर्शीच 
- डोकलाम पेचाच्या वेळी सगळा देश एक झाला असताना तुम्ही चिनी दूतांना भेटत होतात. (राहुलना टोला) 
- 2024 मध्येही तुम्हाला अविश्‍वास ठराव आणण्याचे बळ मिळो अशी मी प्रार्थना करतो. 
- कॉंग्रेसचा स्वतःवर विश्‍वास नाही, इतरांवर काय विश्‍वास ठेवणार? 

दिल्लीत 1984 मध्ये झालेली शीखविरोधी दंगल हे जमावाच्या हिंसाचाराचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. 
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री 

कोणाची काय भूमिका 
- बिजू जनता दलाचा चर्चेत सहभागी न होता सभात्याग 
- शिवसेना तटस्थ 

अविश्‍वास ठरावाच्या बाजूने - 126 

विरोधात - 325 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com