तोंडी तलाकवर मोदींची भूमिका : मुस्लिम महिलांना न्याय हवाच

स्मृती सागरिका कानुनगो
सोमवार, 17 एप्रिल 2017

मौन ही सर्वांत मोठी कला- मोदी

या वेळी मोदींनी भाजप कार्यकर्त्यांनाही उपदेशाचे डोस पाजले. नेते, कार्यकर्त्यांनी आपल्या वाचाळपणाला लगाम घालावा, असा सल्ला त्यांनी दिला. पराभवापेक्षा विजय पचविणे अधिक कठीण असते. नेते आणि कार्यकर्त्यांनी एकलव्यासारखे स्वत:च गुरू बनावे. विजयाचा उत्सव उन्मादी असू नये. मौन ही सर्वांत मोठी कला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भुवनेश्‍वर : विविध मुस्लिम धार्मिक संघटनांच्या विरोधामुळे संवदेनशील बनलेल्या 'तोंडी तलाक'च्या मुद्द्याला थेट स्पर्श करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. अनिष्ट सामाजिक रूढींविरोधात त्या समाजानेच आवाज उठवत पीडितांना न्याय द्यायला हवा. या विषयावरून मुस्लिम समाजामध्ये फूट पडू नये, अशीच आमच्या पक्षाची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले. ते येथे रविवारी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी बोलत होते.

सरकारने 'ओबीसी' आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी सादर केलेल्या विधेयकाची माहिती तळागाळात पोचविण्याचे आवाहनही त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना केले. देशाची 2022 पर्यंत पुनर्बांधणी करण्यासाठी एक मोठी उडी घ्यावी लागेल, असे सांगत त्यांनी सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतरांवर भर दिला. मोदींनी यासाठी 'P-2 G-2' (प्रो-पीपल प्रोऍक्‍टिव्ह गूड गव्हर्नन्स) हा भाजपचा अजेंडा असल्याचे नमूद केले.

आमचे ध्येय केवळ सरकारमधील बदलांपुरते मर्यादित राहू नये, यासाठी समग्र सामाजिक बदलांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. या वेळी मोदींनी भाजप कार्यकर्त्यांनाही उपदेशाचे डोस पाजले. नेते, कार्यकर्त्यांनी आपल्या वाचाळपणाला लगाम घालावा, असा सल्ला त्यांनी दिला.

पराभवापेक्षा विजय पचविणे अधिक कठीण असते. नेते आणि कार्यकर्त्यांनी एकलव्यासारखे स्वत:च गुरू बनावे. विजयाचा उत्सव उन्मादी असू नये. मौन ही सर्वांत मोठी कला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधी यांचे 'छोडो भारत' आंदोलन आकारास यायलाही वीस वर्षांचा काळ लागला होता. गांधीजींच्या मार्गानेच आपल्याला 2022 पर्यंत सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर घडवून आणावे लागेल. जन-धन, वन-धन आणि जल-धन हे तीन नव्या भारताचे आधार असतील, हे सांगायलाही मोदी विसरले नाहीत.