नागरमड्डी-कारवार येथील धबधब्यात बुडून सहा जणांचा मृत्यू 

karwar
karwar

मडगाव : नागरमडी-कारवार येथे धबधब्याच्या ठिकाणी सहलीसाठी गेलेल्या सहा गोमंतकियांचे आज (रविवारी) दुपारी झालेल्या दुर्घटनेत बुडून निधन झाले. मृतांमध्ये चार महिलांचा व दोघा तरुणांचा समावेश आहे. ओहळात पावसामुळे अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात हे सहाही जण वाहून गेले. यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडले असून उत्तरीय तपासणीनंतर हे मृतदेह रात्री उशिरा गोव्यात आणण्यात आले. 

समीर गावडे (32, केरी-फोंडा), सिद्धू च्यारी (22, वास्को), फियोना पाशेको (29, राय), फ्रॅन्झिला पिरीस (21, राय), मार्सेलीना इस्तेबेरो (38, कुडतरी) व रेणुका (23) अशी मृतांची नावे आहेत. फ्रान्झिला व फियोना यांचे मृतदेह सापडले असून उत्तरीय तपासणीनंतर हे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. फ्रॅन्झिला हिचे माहेर तळावली-सासष्टी येथील असून अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. आज दुपारी 1.30च्या दरम्यान ही घटना घडली. 

नागरमडी-कारवार येथे सहलीसाठी फोंडा, राय-कुडतरी, वास्को व मडगाव येथून वेगवेगळे गट आज सकाळी गेले होते. धबधब्याच्या ठिकाणी मौजमजा केल्यानंतर दुपारी पावसाचा जोर वाढल्याने ओहळातील पाण्याचा प्रवाह जोमाने वाहू लागला तसे सर्वांनी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धाव घेतली. यावेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने समीर, सिद्धू, फियोना, फ्रॅन्झिला, मार्सेलीना व रेणुका ओहळाच्या पात्रात अडकले. एका दगडावर चढून एकमेकांना मिठी मारून प्रवाहाचा सामना करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण, काही क्षणातच जोरदार प्रवाहात ते वाहून गेले. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी धावाधाव केली. स्थानिकांनी ओहळाच्या खालच्या बाजूला धाव घेऊन बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण, त्यांना त्यात यश आले नाही. 
कारवार पोलिस व अग्निशमन दलाने स्थानिकांच्या सहकार्याने बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यात फियोना व फ्रॅन्झिला यांचे मृतदेह हाती लागले. कारवारचे पोलिस अधीक्षक पाटील, पोलिस निरीक्षक व इतर अधिकारी घटनास्थळी होते. कारवारचे आमदार सतीश सैल, स्थानिक जिल्हा पंचायत सदस्य यांनीही घटनास्थळी भेट दिली. 

या घटनेची माहिती मिळताच कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स व मृतांच्या कुटुंबीयांनी नागरमडी येथे धाव घेतली. "स्थानिकांच्या मदतीने पोलिस व अग्निशमन दलाने हाती घेतलेल्या शोध मोहिमेत दोन मृतदेह सापडले आहेत. या मृतदेहांची उत्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. हे मृतदेह आज रात्री गोव्यात आणण्यात येतील, असे लॉरेन्स यांनी सांगितले. 

नागरमडी धबधबा परिसर निसर्गरम्य असला तरी धोकादायक आहे. या ठिकाणी मागच्या काही वर्षांत गोवेकर मोठ्या संख्येने जात आहेत. हा परिसर दुर्गम असून या ठिकाणी भेट देणाऱ्यांमध्ये गोवेकरच जास्त आहेत. हा परिसर पावसाळ्यात तर जास्तच धोकादायक असतो. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी कधी वाढते त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी गोवेकरांनी येऊ नये, असा इशारा स्थानिकांनी दिला असल्याचे लॉरेन्स यांनी सांगितले. 

गतवर्षी शाळकरी मुलाचा मृत्यू 
मागच्या वर्षी याच ठिकाणी पणजी येथील एक 16 वर्षीय शाळकरी मुलगा बुडाला होता. सप्टेंबर महिन्यातच ही घटना घडली होती. हा मुलगा आपल्या कुटुंबीयांसोबत नागरमड्डी येथे धबधबा पाहायला गेला होता. ओहळात पोहण्यासाठी उतरला असता तो बुडाला. स्थानिकांनी या घटनेचीही यावेळी आठवण सांगितली. 

दुर्दैवी प्रसंग कॅमेरात कैद 
नागरमडी येथे सहा जण बुडण्याचा दुर्दैवी प्रसंग मोबाईल कॅमेराने काढलेल्या व्हिडियोमध्ये कैद झाला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने सहलीसाठी गेलेले सुरक्षित स्थळी धाव घेत असल्याचे व पाच सहा जणांचा गट एकमेकांना घट्ट धरून पाण्याच्या प्रवाहाचा सामना करत असल्याचे दृश्‍य यात दिसते. सुरक्षित स्थळी धावलेले मदतीसाठी धावाधाव करत असतानाच पाण्यात एकमेकांना धरून राहिलेले जोरदार प्रवाहात वाहून जात असल्याचे काळजाचा थरकाप उडवणारे दृश्‍यही पुढच्या क्षणात या व्हिडिओत दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com