8 नोव्हेंबरला पाळणार काळा दिवस: काँग्रेस

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

या दिवशी देशभरात सर्व राज्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात 18 विरोधी पक्षातील नेते सहभागी होणार आहेत. नोटाबंदीचा निर्णय हा देशातील सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध म्हणून 18 विरोधी पक्षांकडून देशभरात येत्या आठ नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

येत्या आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकारचा हा निर्णय पूर्णपणे फसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला.

गुलाम नबी आझाद म्हणाले, की या दिवशी देशभरात सर्व राज्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात 18 विरोधी पक्षातील नेते सहभागी होणार आहेत. नोटाबंदीचा निर्णय हा देशातील सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे. या निर्णयाला वर्ष झाल्यानिमित्त आम्ही काळा दिवस पाळणार आहोत. नोटाबंदीमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.