गोड बोलून मोदींना पराभूत करा: राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

डाकोर : कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी आक्षेपार्ह शब्द वापरू नयेत. तुम्ही सगळी कॉंग्रेसची मंडळी आहात. प्रेमाने बोला, गोड शब्द वापरा आणि मोदींना हुसकावून लावा. मोदींच्या भाषणातून आता विकासाचा अजेंडा हरवला असून, आता ते केवळ स्वतःविषयीच बोलू लागले आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे सभेत बोलताना केला. डाकोर येथील रणछोडजी मंदिरात दर्शन घेऊन आज राहुल यांनी प्रचाराला सुरवात केली. मोदींनी वेळोवेळी आपले मार्ग बदलले असून, आता त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीही उरलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

राहुल म्हणाले, "भाजपने त्यांचा प्रचार नर्मदेच्या मुद्द्यावरून सुरू केला होता. आता चार- पाच दिवसांनंतर लोकच आम्हाला पाणी मिळत नसल्याचे सांगत आहेत. नर्मदेच्या मुद्द्यावर निवडणूक लढता येत नसल्याचे लक्षात येताच, भाजपने ओबीसींच्या मुद्द्याला हात घातला. भाजपने ओबीसींसाठी काहीही केलेले नाही. पाच- सहा दिवसांनंतर भाजपने पुन्हा एकदा डावे वळण घेत विकासाची भाषा बोलायला सुरवात केली. मोदींनी शनिवारच्या भाषणामध्ये 90 टक्के वेळ हा स्वतःबाबत बोलण्यावरच घालविला. पहिल्यांदा उजवे वळण घेतले, नंतर डावे आणि त्यानंतर त्यांनी आपल्या गाडीला ब्रेक लावला.''

"जीएसटी'वर पुन्हा टीका
ही निवडणूक पंतप्रधान मोदी, भाजप अथवा कॉंग्रेससाठी नसून, ती राज्यातील लोकांच्या भवितव्याशी निगडित आहे. आता मोदी राज्याच्या विकासाबाबत बोलायला तयार नाहीत, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी मौन धारण केले आहे. राज्यामध्ये पटेल, दलित, अंगणवाडी कर्मचारी आणि अन्य घटकांनी एवढे तीव्र आंदोलन केल्यानंतरही पंतप्रधान त्यावर बोलायला तयार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर विधेयकामुळे चोरांचा फायदा झाला असून, त्यांना काळा पैसा पांढरा करता आला. गब्बरसिंग टॅक्‍स असलेल्या "जीएसटी'ने लहान व्यापाऱ्यांना उद्‌ध्वस्त केले असून, त्याने एक लाख लोकांचे रोजगार खाल्ल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.

मंदिराबाहेर मोदीनामाचा जप
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज खेडा जिल्ह्यातील डाकोर परिसरातील श्री रणछोडजी मंदिरास भेट देऊन पूजाअर्चना केली. मंदिरातील धार्मिक विधी आटोपून राहुल गांधी बाहेर येताच उपस्थितांनी मोदी मोदी अशा घोषणा द्यायला सुरवात केल्याने कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले होते. यानंतर काही क्षणांतच राहुल आणि कॉंग्रेस नेते मंदिरातून बाहेर पडले. राहुल यांची ही 26 वी मंदिर भेट होती. तत्पूर्वी शुक्रवारी राहुल यांनी मोगलधान बावला मंदिरास भेट दिली होती, येथील पुजाऱ्यांनी दूरध्वनीवरूनच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधला होता.

अखिलेशवर भडकले
समाजवादी पक्ष गुजरातमध्ये पाच जागा लढवीत असला, तरीसुद्धा येथील विजयाबाबत खुद्द पक्षप्रमुख मुलायमसिंह यादवच साशंक आहेत. येथील निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव होऊ शकतो, असा दावा करत मुलायमसिंह यांनी अखिलेशला पुन्हा टीकेचे लक्ष्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवावर मुलायमसिंह यांनी नाराजी व्यक्त केली. शिवपाल यादव यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली असती, तर पक्ष विजयी झाला असता, असेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com