नेपाळच्या अध्यक्षांचे  भारतात आगमन 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांचे आज भारत भेटीवर आगमन झाले. अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.

नवी दिल्ली : नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांचे आज भारत भेटीवर आगमन झाले. अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. भारताबरोबरील संबंध मजबूत करण्यासाठी त्या भारतीय नेतृत्वाबरोबर चर्चा करणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने ट्‌विटरद्वारे दिली आहे. 

भारत आणि नेपाळ यांच्यातील सहकार्य वाढविण्याबाबत त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. गेल्या वर्षी मधेशींनी केलेल्या आंदोलनामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध तणावपूर्ण बनले होते. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी त्या चर्चा करणार आहेत. भंडारी या गेल्या वर्षीच मे महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार होत्या, मात्र तत्कालीन मंत्रिमंडळाने तयारीची कमी म्हणून त्यांना आपला दौरा रद्द करण्यास सांगितला होता.