'ब्लू व्हेल' : फेसबुक, गुगल, याहूला उच्च न्यायालयाची नोटीस

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: "ब्लू व्हेल'प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेसबुक, गुगल आणि याहू या कंपन्यांच्या भारतातील केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली: "ब्लू व्हेल'प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेसबुक, गुगल आणि याहू या कंपन्यांच्या भारतातील केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

खेडपीठाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनाही नोटीस बजावली असून, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या खेळाबाबत कोणती पावले उचलली आहेत, अशी विचारणा केली आहे.
"ब्लू व्हेल' या खेळावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिक ऍड. गुरुमीत सिंग यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्या वेळी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्या. सी. हरिशंकर यांनी ही नोटीस बजावली. या खेळामुळे देशातील सहा आणि जगभरातील अनेक मुलांचा बळी घेतला आहे. या खेळाबाबत कठोर पावले उचलावित व इंटरनेटवरून खेळाच्या लिंक्‍स तत्काळ हटवाव्यात, अशी मागणी सिंग यांनी केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या वेळी "ब्लू व्हेल' खेळ हटवण्यासाठी कोणती पावले उचलली याबाबतचा अहवाल फेसबुक, गुगल आणि याहू कंपन्यांना द्यावा लागणार आहे.

दरम्यान, या संदर्भात तपासासाठी सायबर सुरक्षा सेल कार्यरत असून, केंद्र सरकराने 15 ऑगस्ट रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. गुगल, फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम, मायक्रोसॉफ्ट, याहू यांना या जीवघेण्या खेळाच्या लिंक्‍स हटवण्याच्या सूचना माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने दिल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे वकील संजय घोष यांनी खंडपीठाला दिली.