अर्जनसिंग यांचे निधन

पीटीआय
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तानमधील १९६५ च्या युद्धात भारतीय हवाई दलाचे नेतृत्व करणारे मार्शल ऑफ द एअरफोर्स अर्जनसिंग (वय ९८) यांचे आज सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले. शनिवारी सकाळी हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तानमधील १९६५ च्या युद्धात भारतीय हवाई दलाचे नेतृत्व करणारे मार्शल ऑफ द एअरफोर्स अर्जनसिंग (वय ९८) यांचे आज सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले. शनिवारी सकाळी हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

हवाई दलामधील सर्वोच्च पदावर म्हणजेच, फाइव्ह स्टार रॅंकवर गेलेले ते एकमेव अधिकारी आहेत. हे पद लष्करातील फिल्ड मार्शलच्या दर्जाचे आहे. देशाच्या लष्करी इतिहासात अर्जनसिंग हे प्रेरणास्थान होते. हवाई दलाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यास सरकारची परवानगी नसतानाही भारत-पाक युद्धात अत्यंत कौशल्याने आणि धाडसाने अर्जनसिंग यांनी हवाई दलाचे नेतृत्व केले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जनसिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  

१५ एप्रिल १९१९ रोजी पंजाब प्रांतातील ल्यालपूर येथे अर्जनसिंग यांचा जन्म झाला. वयाच्या ४४ व्या वर्षी ते भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले होते. त्या वेळीच त्यांनी १९६५ मध्ये युद्धात हवाई दलाचे नेतृत्व केले. आपल्या अलौकिक नेतृत्वाने त्यांनी अखनूरमध्ये पाकिस्तानची दाणादाण उडविली होती. यासाठी त्यांना ‘पद्मविभूषण’ने गौरविण्यात आले. १९६४ ते १९६९ या काळात ते हवाईदल प्रमुख होते.  

तिन्ही सैन्यदलांचा विचार करता तर फाइव्ह स्टार रॅंक मिळवणारे देशाचे तिसरे अधिकारी होते. त्यांच्याशिवाय फिल्ड मार्शल असलेले सॅम माणेकशॉ आणि के. एम. करिअप्पा यांना फाईव्ह स्टार रॅंकने गौरविले होते.

निवृत्तीनंतर सरकारने अर्जनसिंग यांची १९७१ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. नंतर ते व्हॅटिकनमध्ये राजदूत होते.