लोकसभेचे कामकाज गोंधळामुळे तहकूब

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जुलै 2017

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे आज लोकसभेत काहीही कामकाज होऊ शकले नाही. या गोंधळामुळे आधी प्रश्‍नोत्तराचा तास तहकूब झाला. त्यानंतर पूर्ण दिवसभरासाठी कामकाज थांबविण्यात आले.

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे आज लोकसभेत काहीही कामकाज होऊ शकले नाही. या गोंधळामुळे आधी प्रश्‍नोत्तराचा तास तहकूब झाला. त्यानंतर पूर्ण दिवसभरासाठी कामकाज थांबविण्यात आले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल प्रारंभ झाला असला तरी पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांच्या श्रद्धांजलीमुळे कामकाज स्थगित करण्यात आले होते. आज मात्र गोंधळामुळे सभागृह चालू शकले नाही. अर्थात, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी
सत्ताधारी पक्षाचे उमेदवार वेंकय्या नायडू आणि विरोधकांचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कामकाजाच्याच वेळेत पूर्ण झाली. त्यामुळे सभागृहातील उपस्थितीवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. त्याच वेळी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार, कर्जमाफी या मुद्द्यांवर अध्यक्षांपुढील हौद्यात धाव घेऊन घोषणाबाजी आरंभली. शेतकऱ्यांचे प्रश्‍न त्याचप्रमाणे तपास यंत्रणांचा सरकारकडून होणारा कथित गैरवापर यावर दोन्ही पक्षांच्या खासदारांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे अध्यक्षांनी अवघ्या काही मिनिटांत कामकाज थांबविले. तासाभराने (बाराच्या सुमारास) पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतरही याच गोंधळाची पुनरावृत्ती झाल्याने अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. कर्जमाफीसाठी देशभरात संघर्ष यात्रा काढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टीही बोलण्यासाठी उभे राहिले होते; परंतु गोंधळात त्यांनाही बोलता आले नाही.