रेल्वे मंत्रालय घेणार "ऍपल'ची मदत: सुरेश प्रभू

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

गतिमान एक्‍स्प्रेसचा वेग वाढणार

नवी दिल्ली,: देशभरातील रेल्वे गाड्यांना वेगाचा बूस्टर डोस देण्यासाठी रेल्वे मंत्रालय सज्ज झाले असून यासाठी सरकार "ऍपल'सारख्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मदत घेण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून रेल्वेचा वेग प्रतितास सहाशे किलोमीटरपर्यंत वाढविला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज दिली.

गतिमान एक्‍स्प्रेसचा वेग वाढणार

नवी दिल्ली,: देशभरातील रेल्वे गाड्यांना वेगाचा बूस्टर डोस देण्यासाठी रेल्वे मंत्रालय सज्ज झाले असून यासाठी सरकार "ऍपल'सारख्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मदत घेण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून रेल्वेचा वेग प्रतितास सहाशे किलोमीटरपर्यंत वाढविला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज दिली.

दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते कोलकता या दोन वर्दळीच्या मार्गांवरील गतिमान एक्‍स्प्रेसच्या वेगामध्ये वाढ केली जाणार असून यासाठी निती आयोगाने रेल्वे मंत्रालयाच्या अठरा हजार कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. गतिमान एक्‍स्प्रेसच्या वेगामध्ये दोनशे किलोमीटर प्रतितास एवढी वाढ करण्याचा सरकारचा विचार असल्याचे प्रभू "असोचेम'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले. या गाड्यांचा वेग वाढविला तर वेळेची किती बचत होईल याची तुम्ही कल्पना करू शकता असेही प्रभू यांनी स्पष्ट केले. या चर्चासत्रामध्ये रेल्वे खात्यातील अनेक बडे अधिकारी सहभागी झाले होते.

तंत्रज्ञान विकासातही सहभाग
सरकारने सहा ते आठ महिन्यांपूर्वीच तंत्रज्ञानक्षेत्रातील बड्या कंपन्यांसोबत बोलणी केली असून गाड्यांचा वेग सहाशे किलोमीटर प्रतितासपर्यंत नेण्याचा आमचा विचार आहे. यासाठीचे तंत्रज्ञान भारत केवळ आयातच करणार नाही तर त्याच्या विकासामध्येही आपली भागिदारी असेल. रेल्वेची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाचा विषय असून स्वयंचलित डब्याच्या निर्मितीवर आमचे मंत्रालय काम करत आहे. यामध्ये अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून ते रेल्वे रूळ कोठे तुटले आहेत याची माहिती यंत्रणेस देईल.

सायबर सुरक्षेला प्राधान्य
रोजच्या रेल्वे वाहतुकीस सायबर सुरक्षेचे कवच प्रदान करण्याबाबतही रेल्वे मंत्रालय गांभीर्याने विचार करते आहे. मागील तीन वर्षांमध्ये यासाठी सरकारने "रेल क्‍लाऊड सर्व्हर' आणि "रेल सार्थी ऍप' यासारखे उपक्रम हाती घेतले आहेत. रेल्वेचा वापर अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही अधिकाधिक उच्च तंत्रज्ञानाचा वापर करतो आहोत. डिजिटल व्यवहार हा याच प्रक्रियेचा भाग आहे. सायबर सुरक्षेच्या नेमक्‍या कोणत्या भागात काम करायचे हे आधीच निर्धारित करण्यात आले आहे असेही प्रभू यांनी स्पष्ट केले.

श्रीधरन यांनी राजीनामा नाकारला
कोची : मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी मागील महिन्यामध्ये लखनौ आणि कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या सल्लागारपदाचा दिलेला राजीनामा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फेटाळून लावला आहे. मी आपणांस राजीनामा देण्याची परवानगी देऊ शकत नाही. याऊलट आपणांकडे वाराणसी, आग्रा, मेरठ आणि गोरखपूरची देखील जबाबदारी सोपविली जात असल्याचे योगींनी आपणांस सांगितल्याचे श्रीधरन यांनी स्पष्ट केले. उत्तरप्रदेशातील रेल्वे प्रकल्प वेगात पूर्ण करण्यासाठी योगी सरकारने कंबर कसली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयही युद्धपातळीवर काम करताना दिसते.