भारतीय म्हणतात, 'सुंदर मी होणार'...

वृत्तसंस्था
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

सौंदर्य प्रसाधनांची उलाढाल 35 अब्ज डॉलरपर्यंत वाढणार

सौंदर्य प्रसाधनांची उलाढाल 35 अब्ज डॉलरपर्यंत वाढणार

नवी दिल्ली: भारतीय महिलांना नटण्या-सजण्याची आवड असते. अगदी प्राचीन भारतीय समाजातील स्त्रियाही निसर्गात उपलब्ध विविध प्रकारच्या पाना-फुले, रंग, माती यांचा वापर सौंदर्य खुलविण्यासाठी करीत असल्याचे दाखले मिळतात. ही बाब लक्षात घेता आज एकविसाव्या शतकात भारतातीय बाजारपेठांमध्ये सौंदर्य प्रसाधनांच्या साधनांची रेलचेल दिसून येते. भारतीय तसेच अनेक विदेशी ब्रॅंडचे साहित्य सहज उपलब्ध होत आहे. सौंदर्य प्रसाधनांची भारतातील उलाढाल सध्या 6.5 अब्ज डॉलर असून, 2035 पर्यंत त्यात 35 अब्ज डॉलर एवढी प्रचंड भर पडणार असल्याचे "असोचॅम' व "मिसेसइंडिया' या संस्थांच्या संयुक्त पाहणीतून निदर्शनास आले आहे.

आपण सुंदर दिसावे ही इच्छा प्रत्येकालाच असते. किशोरवयीन मुले-मुली याबाबत अधिक जागरूक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच 2005 ते 2017 या कालावधीत सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्याचे प्रमाण या गटातील मुलांमध्ये वाढलेले दिसले. स्वतःला आकर्षक ठेवण्यासाठी मदत करणारी उत्पादने वापरल्याने आत्मविश्‍वास वाढतो, असे मत 68 टक्के जणांनी व्यक्त केले आहे. यात तरुणांबरोबरच प्रौढांचाही समावेश आहे. मोठ्या शहरांमध्ये राहणारी व डिजिटल युगात वावरणारी तरुण पिढीचा कल ऑनलाइन खरेदीवर असतो. त्यानुसार 82 टक्के तरुण सौंदर्य प्रसाधनेही ऑनलाइन मागवितात, तर स्वतःच्या सौंदर्यांत भर टाकणारे कपड्यांसह विविध वस्तू आपल्या सोयीनुसार दुकानातून खरेदी करण्याचे प्रमाण 45 टक्के असल्याचे या पाहणीतून दिसले.

महिलांप्रमाणे पुरुषही आता रुबाबदार, आकर्षक दिसण्यासाठी वेशभूषा, केशभूषेकडे आवर्जून लक्ष देऊ लागले आहेत. गेल्या पाच वर्षांत पुरुषांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेत 42 टक्के वाढ झाली आहे. भारतातील वैयक्तिक देखभाल व सौंदर्य उत्पादनांच्या उद्योगाच्या विकास दरापेक्षा ही वाढ अनेक पटींनी जास्त आहे, असे चेंबरच्या प्रवक्‍त्याने सांगितले. नैसर्गिक आणि वनौषधींपासून तयार केलेली सौंदर्यवर्धक उत्पादने खरेदी करण्याचा कल भारतीय ग्राहकांचा असल्याने अशा उत्पादनांच्या वाढीचा दर 12 टक्के होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या भारतीय सौंदर्य प्रसाधनांना विदेशात मोठी मागणी आहे. संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, नेदरलॅंड, सौदी अरेबिया, जर्मनी, जपान, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, इंग्लंड, चीन, इंडोनेशिया, फ्रान्स, रशिया आणि इटली आदी देशांमध्ये भारतीय सौदर्य उत्पादने निर्यात होतात. सौंदर्य प्रसाधने, प्रसाधनगृहासाठी आवश्‍यक साहित्य व विविध प्रकारची तेले यांची 2015-16मधील निर्यात 100 कोटी 72 लाख डॉलर होती. त्याच वेळी आयात 70 कोटी 35 लाख 80 हजार डॉलर एवढी होती.

नैसर्गिक उत्पादनांना मागणी
भारतीय उत्पादनांमध्ये नेल पॉलिश, लिपस्टिक व लिप ग्लॉस यांना सर्वाधिक मागणी आहे. ही उत्पादने फुले, झाडांची मुळे, तेले यापासून मिळणाऱ्या नैसर्गिक रंगद्रव्याचा वापर करून बनविली जात असल्याने ती लोकप्रिय आहेत. "नैसर्गिक', "सेंद्रिय', "वनस्पतीयुक्त', "घातक रसायनांपासून मुक्त' अशी सूचना असलेली उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. काही वेळा यात धार्मिक भावनांनाही महत्त्व दिले गेल्याचे आढळून आले.