स्वदेशात गोमांस खाऊन भारतात या; नव्या मंत्र्यांचा विदेशी पर्यटकांना सल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

अल्फोन्स यांनी चार दिवसांपूर्वी पर्यटन मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतला तेव्हा "केरळमध्ये गोमांस खाण्यावर बंदी नसेल', असे स्पष्ट केले होते. गोमांस खाऊ नका, असे भाजपने कधीच सांगितले नाही, असे सांगताना त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विधानाची आठवण करुन दिली.

नवी दिल्ली: "भारतात पर्यटनासाठी येणार असाल तर त्यापूर्वी तुमच्या देशातच गोमांस (बीफ) खाऊन मग या,'' असा विक्षिप्त सल्ला नवे केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फोन्स कन्ननथानम ऊर्फ केजे अल्फोन्स यांनी विदेशी पर्यटकांना दिला आहे.

भुवनेश्‍वर येथे गुरुवारी (ता.7) आयोजित केलेल्या "इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स' या संघटनेच्या परिषदेत अल्फोन्स सहभागी झाले होते. भारतात सध्या गोरक्षकांची सुरू असलेली मनमानी, अनेक राज्यांत गोमांसावरील बंदी यांचा परिणाम भारतभेटीवर येणाऱ्या विदेशी पर्यटकांवर परिणाम होण्याच्या शक्‍यतेबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता अल्फोन्स म्हणाले,"" विदेशी पर्यटक त्यांच्या देशात गोमांस खाऊनच भारतात येऊ शकतात.''

अल्फोन्स यांनी चार दिवसांपूर्वी पर्यटन मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतला तेव्हा "केरळमध्ये गोमांस खाण्यावर बंदी नसेल', असे स्पष्ट केले होते. गोमांस खाऊ नका, असे भाजपने कधीच सांगितले नाही, असे सांगताना त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विधानाची आठवण करुन दिली.

"गोव्यात गोमांस सेवन करण्यास मुभा असेल, असे पर्रीकर म्हणाले होते, त्याप्रमाणे केरळमध्येही गोमांस भक्षणास परवानगी असेल,'' असे अल्फोन्स यांनी त्या वेळी सांगितले होते. एवढेच नाही तर ""गोमांस खाऊ नका, असे सांगण्याचा भाजपचा अधिकार नाही. देशातील कोणत्याही ठिकाणच्या नागरिकांच्या खाद्य पद्धतीत आपण बदल करू शकत नाही. आपण काय खावे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार लोकांनाच आहे,'' असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अल्फोन्स रविवारी (ता.10) केरळला भेट देणार आहेत. केरळ भाजप प्रदेशच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात येणार आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कुम्मानोम राजशेखरन यांच्यासह राज्यातील भाजप नेते व कार्यकर्ते अल्फोन्स यांच्या स्वागतासाठी तिरुअनंतपुरम येथील विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.