विधेयके गोंधळात मंजूर करू नका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

वेंकय्या नायडू यांच्याकडून सर्वपक्षीय अपेक्षा

वेंकय्या नायडू यांच्याकडून सर्वपक्षीय अपेक्षा

नवी दिल्ली: गोंधळ चालू असताना कोणतेही विधेयक मंजूर करू नये हा पायंडा तुम्ही कायम ठेवा, अशी मागणी बहुतांश विरोधकांनी उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे आज केली. त्यावर, "2014 पर्यंत प्रचंड गदारोळात 21 विधेयके घिसडघाईने मंजूर करणाऱ्या विरोधकांना गेल्या तीन वर्षांत गोंधळात विधेयकांना मंजुरी नको, हा साक्षात्कार झाला,' असा सूचक टोला सभागृहनेते अरुण जेटली यांनी लगावला. स्वतः नायडू यांनी, गोंधळच झाला नाही व आहे त्या कामकाजाच्या वेळेचा सदुपयोग केला, तर वाद उद्भवणार नाही व छोट्या पक्षांनाही बोलण्यास संधी मिळेल असे निरीक्षण मांडले.

नायडू यांचे स्वागत करतानाही राज्यसभेत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांत वादाच्या ठिणग्या उडाल्या. लिहून आणलेले भाषण यंत्रवत वाचून दाखविण्याचा पायंडा मोडताना नायडूंनी उत्स्फूर्तपणे भावना मांडल्या. "इफ यू कोऑपरेट, आ कॅन ऑपरेट वेल' असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांच्याबरोबरच्या आठवणींना, किश्‍श्‍यांना उजाळा दिला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान या सर्वोच्च पदांवरील व्यक्ती गरिब घरांतून व घराण्याचे कोणतेही पाठबळ नसताना विराजमान झाल्यात हे लोकशाहीचे सौंदर्य असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी संपन्न पार्श्‍वभूमी असूनही देशासाठी असीम त्याग केलेल्या महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल व मोतिलाल नेहरूंपासून अनेकांची उदाहरणे देऊन, श्रीमंतांचे, कोट्यधीशांचे भारताच्या जडणघडणीतील दुर्लक्षित करू नका, असा चिमटा काढला. सीताराम येचुरी यांनी राज्यसभाध्यक्षांचे आसन हे विक्रमादित्याच्या सिंहासनासारखे असल्याचे सांगितले.

नायडू म्हणाले, की सत्तर वर्षांनी गरिबी, असमानता, ग्रामीण-शहरी दरी हे दोष असूनही भारत बुद्धिमत्ता व मनुष्यबळ या देणग्यांच्या जोरावर जगात अग्रेसर आहे. गोंधळ, गदारोळ करताना जनादेशाचा आदरही राखला पाहिजे.

सदस्यांच्या नायडूंकडून अपेक्षा
- प्रफुल्ल पटेल ः संसदीय चर्चेचा दर्जा व विनोदबुद्धी कामकाजातून हरवत चालली आहे, ती परत यावी.
- संजय राऊत ः तुम्ही कडक प्राचार्य राहा; पण छोट्या पक्षांनाही पुरेसा वेळ द्या.
- सतीश मिश्रा ः मागच्या बाकांकडे लक्ष द्या व त्यांना न्याय द्या.
- रामदास आठवले ः तुम्ही मला बोलू दिले नाही तर कामकाज चालणार नाही!
- तिरूची सिवा व डेरेक ओब्रायन ः राज्यसभेत सदस्यांना मातृभाषेतून बोलण्यासाठी सर्वभाषक अनुवादकांची सोय उपलब्ध करा.
- रामगोपाल यादव ः मंत्री म्हणून तुम्ही सर्वपक्षीय खासदारांत लोकप्रिय होतात तसेच यापुढेही रहा.