निवडणुकीच्या तयारीला लागा : मोदी

narendra modi
narendra modi

राज्यातील खासदारांबरोबर चर्चा; योजनांची माहिती द्या

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला आता जेमतेम 15 महिने राहिले आहेत. सत्तारूढ खासदारांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागावे. काय झाले नाही यापेक्षा केंद्र सरकारने काय केले, हे जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोचवावे, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप खासदारांना दिले. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार व महामार्गमंत्री नितीन गडकरी या वेळी उपस्थित होते. राज्यातील प्राचीन गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे ही लोकचळवळ बनावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संसदीय अधिवेशनात भाजपच्या खासदारांना राज्यवार संबोधित करण्याची प्रथा मोदींनी घातली. त्याच मालिकेतील हा पुढचा टप्पा होता. या बैठकीत मोदींनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. त्याचरोबर केंद्र सरकारच्या लक्षणीय योजनांचीही माहिती जनतेपर्यंत पोचविण्यास सांगितले. डिजिटल इंडियासारख्या योजनांचा त्यांनी आढावा घेतला. आगामी तिरंगा यात्रा व स्वातंत्र्यदिनाच्या उपक्रमांबाबत काही सूचना केल्या गेल्या.

या बैठकीत राज्याचे सर्व खासदार हजर होते. मुंबईकर असलेले सचिन तेंडुलकर यांनी बैठकीकडे पाठ फिरविली; मात्र कालचा गोंधळ पाहता त्यांनी नंतर राज्यसभेत तास-दीड तासासाठी हजेरी लावली. काही खासदारांना बोलण्याचीही संधी देण्यात आली. सूत्रांनी सांगितले, की खासदार अमर साबळे यांनी नक्षलवादाचा व डाव्या दहशतवादाचा धोका शहरांच्या उंबरठ्यापर्यंत पोचला असून, त्याला थोपविण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. हा गंभीर विषय असल्याचे मान्य करून मोदींनीही त्यांच्याशी सहमती दर्शविली. संभाजीराजे छत्रपती यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची गरज प्रतिपादन करताच पंतप्रधानांनी ही लोकचळवळ व्हावी, असे सांगितले. सारेच सरकारवर सोडून चालणार नाही, असेही ते म्हणाले. चिंतामण वनगा व विकास महात्मे यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय मांडला. वनगा यांनी आदिवासींच्या हक्कांबाबत जागृती करण्याची गरज व्यक्त केली. किरीट सोमैय्या यांनी मुंबईतील स्थानिक पातळीवरचा विषय एका राष्ट्रीय बैठकीत सांगताच पंतप्रधानांनी आश्‍चर्याने गडकरींकडे पाहिल्याचे समजते. एका तंबाखूतज्ज्ञ खासदाराने असेच काही संदर्भहीन बोलणे सुरू करताच पंतप्रधानांनी त्यांना, "अहो काय बोलता आहात? तुम्ही इतके ज्येष्ठ खासदार आहात आणि कोठे कोणता विषय मांडत आहात?' अशा शब्दांत झापल्याचीही माहिती आहे.

संभाजीराजे भाजपशी संलग्न
राष्ट्रपती नियुक्त संभाजीराजे छत्रपती यांनी नियमानुसार स्वतःला भाजपशी संलग्न करून घेतल्याचे पत्र राज्यसभा सचिवालयाला दिले आहे. ते अशा बैठकांना नियमित हजर राहतात. आजच्या बैठकीनंतर मोदी संभाजीराजे यांना छत्रपती करणार, अशा चर्चेला पेव फुटले; मात्र त्यांनी स्वतः आपण अशा कोणत्याही संभाव्य घडामोडीबाबत अनभिज्ञ आहोत, असे स्पष्टपणे सांगितले. मुळात राष्ट्रपती नियुक्त सदस्यांना केंद्रात मंत्री केले जात नाही, ही संसदीय परंपरा आहे. व्ही. पी. सिंह यांच्यासारखे अपवाद वगळता सारेच पंतप्रधान व सारेच पक्ष यांनी संसदीय कामकाजात प्रथा-परंपरांचे काटेकोर पालन केल्याचे दिसते. सचिन तेंडुलकर यांनाही मंत्री करण्याबाबतच्या चर्चा 2012 मध्ये जोरात होत्या; मात्र मनमोहनसिंग सरकारने 1952 पासूनची प्रथा मोडून तसे करण्याचे टाळले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com