देशातील चारशे भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर: गणेश देवी

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

भाषा या हवा पाण्यांप्रमाणे मोफत मिळालेल्या नाहीत त्या मानवनिर्मित आहेत. त्यांच्या निर्मितीसाठी मनुष्यप्राण्याला खूप परिश्रम घ्यावे लागले. एखाद्या भाषेचा जन्म होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागतात. आम्ही आमच्या भाषा गमावून बसलो तर तो आमच्या पूर्वजांवर मोठा अन्याय ठरेल.
- गणेश देवी, भाषा संशोधक आणि अभ्यासक

इंग्रजीचा मराठी, हिंदी, बंगालीला धोका नाही

नवी दिल्ली : भाषिक वैविध्याने समृद्ध असणाऱ्या भारतातील 780 पैकी चारशे भाषा या पुढील 50 वर्षांमध्ये नष्ट होण्याची शक्‍यता असल्याची भीती ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी व्यक्त केली आहे.

जगभरामध्ये चार हजारांपेक्षाही अधिक भाषा बोलल्या जातात त्यातील 10 टक्के भाषा या भारतातील असून, त्यांनाच सर्वाधिक धोका आहे. ज्ञानभाषा बनलेल्या इंग्रजीचा हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलुगू या भाषांना कसलाही धोका नसल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय लोकभाषा सर्वेक्षणाच्या अकरा खंडांचे प्रकाशन नुकतेच दिल्लीमध्ये झाले, यासाठी देवी येथे आले होते.

जगातील सहा हजारांपैकी चार हजार भाषा पुढील पन्नास वर्षांमध्ये नष्ट होऊ शकतात. या चार हजार भाषांमध्ये भारतातील चारशे भाषांचा समावेश आहे, त्यामुळे भारतातील 10 टक्के भाषा संकटात असल्याचा निष्कर्ष काढता येईल. इंग्रजीचा प्रादेशिक भाषांना धोका असल्याचा बाऊ केला जातो, पण त्यातही फारसे तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदी, बंगाली, तेलुगू, मराठी, कन्नड, मल्याळम, गुजराती आणि पंजाबी या भाषांचा पाया मजबूत असून, जगातील पहिल्या तीस भाषांमध्ये त्यांचा समावेश होतो. या तीस भाषांना साधारणपणे एक हजार वर्षांचा इतिहास असून, दोन कोटींपेक्षाही अधिक लोक त्यांचा वापर करतात. या भाषांना चित्रपट, संगीत, शैक्षणिक व्यवस्था आणि संपन्न माध्यमसृष्टीचे पाठबळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

किनारी भाषांना धोका
किनारी भागातील भाषांना नष्ट होण्याचा अधिक धोका आहे, काही भाषा कालौघात लुप्त होऊ लागल्या असून, याला प्रामुख्याने किनारी भागातील असुरक्षित जीवनमान कारणीभूत आहे. कार्पोरेट जगताने समुद्रात आपले पाय रोवायला सुरवात केली असून, खोल समुद्रात अत्याधुनिक यंत्रांच्या साह्याने केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांना स्थलांतर करावे लागत आहे. स्थानिक मच्छीमार जसजसे किनाऱ्यापासून दूर जात आहेत, तसतसे त्यांच्या भाषेचा ऱ्हास होताना दिसून येतो असे निरीक्षणही देवी यांनी नोंदविले.

महासर्वेक्षण
मागील काही वर्षांत आदिवासींच्या भाषा संपन्न झाल्याचे दिसून येते. नुकत्याच भाषिक सर्वेक्षणासाठी देशभरातील 780 भाषांचा अभ्यास करण्यात आला होता, यामध्ये तीन हजार लोक सहभागी झाले होते, देशातील 27 राज्यांमध्ये यासाठी संशोधन करण्यात आले होते. आता सिक्कीम, गोवा, अंदमान आणि निकोबार बेटांवरील भाषिक बदल अभ्यासण्याचा मनोदय देवी यांनी व्यक्त केला. देवी हे भाषा संशोधन आणि प्रकाशन केंद्र आणि गुजरातच्या तेजगढमधील आदिवासी अकादमीचे संस्थापक आहेत.

 

काही भाषांचे जीवनदान
मी 2003 मध्ये भाषिक सर्वेक्षणाची संकल्पना मांडली आणि 2010 मध्ये यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. या सर्वेक्षणात 3 हजार लोक सहभागी झाले होते. माहितीचे संकलन 2013 मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्याच्या प्रकाशनाची प्रक्रिया सुरू झाली. काही भाषांची पडझड सुरू असताना आदिवासी भाषा मात्र अधिक समृद्ध होताना आणि वाढताना दिसतात. समताली, गोंडी (ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र), ष्ट्र, राजस्थान, गुजरात), मिझो (मिझोराम), गारो आणि खासी (मेघालय) आणि कोतबारक (त्रिपुरा) या भाषांचा वेगाने विस्तार होतो आहे. या आदिवासी समुदायातील शिकलेल्या व्यक्तींनी या भाषांचा वापर करायला सुरवात केल्याने त्यांचा विस्तार होत असल्याचे देवी म्हणाले.

 

Web Title: new delhi news four hundred languages and Ganesh Devy