उमेदवार निवडीची सर्वपक्षीय लगबग

महेश शहा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष "ऍक्‍शन मोड'मध्ये गेले आहेत. सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने उमेदवारांच्या निवडीस सुरवात केली आहे. भाजपने दिवाळीमध्येच उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीच ही प्रक्रिया सुरू केली होती. साधारणपणे उद्या (ता. 26) पर्यंत ती पूर्ण होऊ शकते.

कॉंग्रेसनेही उमेदवार पारखून घ्यायला सुरवात केली असून, महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील छाननी समितीच्या दोन बैठका दिल्ली आणि अहमदाबादेत होणार आहेत. आम आदमी पक्षाने तर यापुढे जात आपले अकरा जागांवरील उमेदवार याआधीच जाहीर केले आहेत. कॉंग्रेस आणि भाजपला मात्र उमेदवारांची निवड करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये जातीचा पत्ताच प्रभावी ठरल्याचे चित्र आहे.

भाजपसमोर आव्हाने
नोटाबंदी, जीएसटी आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती, बेरोजगारी अशी मोठी आव्हाने भाजपसमोर आहेत. कॉंग्रेसने नेमके याच मुद्यांचे भांडवल करायला सुरवात केल्याने भाजप चांगलाच अडचणीत आला आहे. मुख्यमंत्री विजय रूपानी यांना आमचा पक्ष विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवेल, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपला अधिक लोकानुनयी घोषणा करणे शक्‍य व्हावे, म्हणून जाणीवपूर्वक उशिराने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारने तशा घोषणाही केल्याचे दिसून येते.

हार्दिकच्या मागण्या
कॉंग्रेस आणि हार्दिक पटेल यांच्यात समझोता होण्याची शक्‍यता वर्तविली जात असली तरीसुद्धा राहुल यांच्याकडून आरक्षणाचे वचन मिळाल्यानंतरच हार्दिक पुढाकार घेतील, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक संस्थांमध्ये पटेलांना आरक्षण मिळावे, अशी हार्दिक यांची मागणी आहे. याआधीही हार्दिकने अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली, तेव्हा कॉंग्रेस कार्यकारिणीमध्ये आमच्या समाजाच्या नेत्यांना प्राधान्या दिले जावे, अशी मागणी केली होती.