भारतातील निम्म्या ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आजार

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

"एजवेल फाउंडेशन'च्या पाहणीतील निष्कर्ष; एकटेपणा व नातेसंबंधामुळे परिणाम

नवी दिल्ली: एकटेपणा व अन्य नातेसंबंधातील समस्यांमुळे भारतातील 100 पैकी 43 ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक बिघाड होत असल्याचा दावा "एजवेल फाउंडेशन' या संस्थेने केला आहे.

"एजवेल फाउंडेशन'च्या पाहणीतील निष्कर्ष; एकटेपणा व नातेसंबंधामुळे परिणाम

नवी दिल्ली: एकटेपणा व अन्य नातेसंबंधातील समस्यांमुळे भारतातील 100 पैकी 43 ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक बिघाड होत असल्याचा दावा "एजवेल फाउंडेशन' या संस्थेने केला आहे.

या वर्षी जून व जुलै महिन्यात देशभरातील 50 हजार ज्येष्ठ नागरिकांकडून याबद्दल माहिती घेण्यात आली. यातील निम्म्यापेक्षा जास्त वृद्धांनी कुटुंबात आपली योग्य काळजी घेत नसल्याचे मत नोंदविले आहे. ""एकटेपणा, नातेसंबंधातील तणाव यामुळे 43 टक्के वृद्धांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. तसेच आमच्या गरजा व आवडीनिवडीकडे कुटुंबीयांकडून दुर्लक्ष गेले जाते, असेही 45 टक्के वृद्धांनी म्हटले आहे,'' अशी नोंद या अभ्यासात केली आहे. ज्येष्ठांचे कल्याण व त्यांना सक्षम करण्यावर विचार करून सरकारने व संबंधित यंत्रणांनी योजना आखाव्यात, असे आवाहन "एजवेल'ने केले आहे.

ज्येष्ठांचे दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन सरकारच्या सर्व उपक्रम व योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लाभदायी ठरणाऱ्या तरतुदी करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. त्यांचे हक्क, गरजा याकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांना विचारात न घेतल्याने सामाजिक विकास कार्यक्रमाला बाधा पोचू शकते, असा इशारा या संस्थेने दिला आहे. त्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष देऊन तसेच समाजात सक्रिय सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन ज्येष्ठांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्‍यक आहे, असे "एजवेल'चे अध्यक्ष हिमांशु रथ यांनी नमूद केले.

वेगाने होणाऱ्या सामाजिक - आर्थिक सुधारणा व देशभरातील जनसांख्यिकी संक्रमण याचा सर्वाधिक फटका समाजातील ज्येष्ठ नारिकांना बसला आहे, असे मत नोंदवून रथ म्हणाले, ""वृद्धांसंबंधीचे प्रश्‍न आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. आधुनिक मूल्याधारिक समाजामुळे पूर्वपार चालत आलेल्या आपल्या जुन्या परंपरा नष्ट होत आहेत. स्पर्धेच्या व धावपळीच्या आजच्या युगात खंबीरपणे तग धरणे ज्येष्ठांना दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे.'' वृद्धापकाळासाठी आर्थिक नियोजन करणे हेही महत्त्वाची बाब ठरत आहे. 60 वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले.

सेवानिवृत्त झालेल्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी रथ यांनी सुचविलेले उपाय
- जे वृद्ध एकटे राहतात त्यांच्यासाठी मोफत आरोग्य सल्ला
- वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांवर उपचार व संशोधनासाठी "एम्स'च्या धर्तीवर राष्ट्रीय संस्था स्थापन करणे
"राष्ट्रीय ग्रामीण विकास निधीप्रमाणे ज्येष्ठांसाठी राष्ट्रीय निधीची उभारणी करणे
- राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणे
- पंतप्रधान स्वयंरोजगार योजना