ऑक्‍टोबर 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त: राजनाथसिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे, याला सरकारचा प्राधान्यक्रम आहे.
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली: संपूर्ण देश ऑक्‍टोबर 2019 पर्यंत हागणदारीमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज व्यक्त केला. गृह मंत्रालयाच्या "स्वच्छता ही सेवा' या अभियानाचा शुभारंभ राजनाथसिंह यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

राजनाथसिंह म्हणाले, ""स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने 76 मंत्रालये व विभागांच्या मदतीने 12 हजार कोटी रुपये प्रस्तावित निधीची एक योजना आखली आहे. महिलांसाठी घरात शौचालयांची निर्मिती केल्याने त्यांचा सन्मान व सुरक्षितता सुनिश्‍चित होते. आपल्या मुलांची उत्पादकता व पोषकता वाढविण्यास "स्वच्छता ही सेवा' हे अभियाना फायदेशीर ठरेल.''

देशातील सिक्कीम, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाना आणि उत्तराखंड ही राज्ये यापूर्वीच हागणदारीमुक्त करण्यात आल्याची माहितीही राजनाथसिंह यांनी या वेळी दिली. आतापर्यंत सुमारे 4 लाख 60 घरांमध्ये तसेच, 4 लाख शाळांमध्ये शौचालयाची निर्मिती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.