देशाचा समृद्ध वारसा अयोग्य हातात: राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली: "भारताच्या ज्या संकल्पनेसाठी इंदिरा गांधी आयुष्यभर लढल्या, त्यावर वाढत्या असहिष्णुतेने आघात केला असून, देशाचा समृद्ध वारसा आता इतिहासाचे पुनर्लेखन, असत्याचा प्रचार करणाऱ्या आणि अशास्त्रीय विचार लादणाऱ्यांच्या हाती आहे,'' अशा शब्दांत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपचे नाव न घेता हल्ला चढविला.

नवी दिल्ली: "भारताच्या ज्या संकल्पनेसाठी इंदिरा गांधी आयुष्यभर लढल्या, त्यावर वाढत्या असहिष्णुतेने आघात केला असून, देशाचा समृद्ध वारसा आता इतिहासाचे पुनर्लेखन, असत्याचा प्रचार करणाऱ्या आणि अशास्त्रीय विचार लादणाऱ्यांच्या हाती आहे,'' अशा शब्दांत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपचे नाव न घेता हल्ला चढविला.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसतर्फे दिल्या जाणाऱ्या "इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार' वितरणाच्या सोहळ्यात राहुल गांधींनी ही तोफ डागली. कर्नाटक शैलीचे प्रसिद्ध गायक आणि लेखक टी. एम. कृष्णा यांना यंदाचा पुरस्कार देण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल, मानपत्र आणि दहा लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि पुरस्कार निवड समितीचे प्रमुख असलेले कॉंग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा या वेळी उपस्थित होते. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत. त्यांचे भाषण राहुल गांधी यांनी वाचून दाखविले.

राष्ट्रीय एकात्मतेसाठी इंदिरा गांधींच्या योगदानाचे स्मरण करताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. इंदिरा गांधींनी दारिद्य्रनिर्मूलन, कृषी, उद्योग, तंत्रज्ञान या क्षेत्रात महत्त्वाचे काम केले. पण त्याही पेक्षा त्यांचे सर्वाधिक योगदान राष्ट्रीय एकात्मतेसाठी होते. सध्या संकुचित राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात विभाजन सुरू असताना इंदिरा गांधींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा इंदिराजींनी जपलेल्या मूल्यांना नवा उजाळा देणारा आहे. इंदिरा गांधींच्या संकल्पनेतील भारतीयत्वावर वाढत्या असहिष्णुतेमुळे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. आज आपल्यावर एकतर्फी, भेदभावपूर्ण भारतीयत्व लादले जात आहे.

उदारता आणि सहिष्णूपणा हा भारतीयत्वाचा गाभा नाकारला जात आहे. राष्ट्रीय एकात्मता या मूल्याची कधी नव्हे तेवढी आज नितांत गरज आहे, असाही टोला राहुल गांधींनी लगावला. तर देशाच्या प्रगतीसाठी सलोखा आणि परस्पर सौहार्दाची आवश्‍यकता आहे असे इंदिरा गांधीचे म्हणणे होते, असे प्रतिपादन डॉ. मनमोहनसिंग यांनी केले.