काश्‍मीरबाबत अमेरिकेच्या उल्लेखाकडे केंद्राचे दुर्लक्ष

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

नवी दिल्ली : अमेरिकेने अधिकृत निवेदनात "भारतीय नियंत्रित जम्मू-काश्‍मीर' असा उल्लेख केला असला तरी, केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे. अमेरिकेने यापूर्वीही असा उल्लेख केला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज निदर्शनास आणून दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या अधिकृत निवेदनात "भारत नियंत्रित जम्मू-काश्‍मीर' असा उल्लेख करण्यात आला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्‍या सैद सलाहुदीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करताना या दहशतवादी गटाने 17 जण जखमी झालेल्या एप्रिल 2014 मध्ये भारतीय नियंत्रित जम्मू-काश्‍मीरमधील हल्ल्यासह अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचे निवेदनात म्हटले होते. यावर कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ यांनी याविषयी बोलताना सांगितले, की अमेरिकेच्या या निवेदनाला फारसे महत्त्व देण्याची आवश्‍यकता नाही. अमेरिकेने असा उल्लेख पहिल्यांदा केलेला नाही. यापूर्वीही हे घडले आहे.

सलाहुदीन भारताविरुद्ध सीमापार दहशतवाद पसरवत आहे, एवढाच अमेरिकेच्या निवेदनाचा अर्थ आहे. अमेरिकेने 2010 ते 2013 या कालावधीतही असा उल्लेख केला आहे.