ज्येष्ठ नेते अडवानींवर शुभेच्छांचा वर्षाव

पीटीआय
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

दृष्टिहीन मुलांबरोबर 90 वा वाढदिवस साजरा

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आपला 90 वाढदिवस बुधवारी दृष्टिहीन मुलांबरोबर साजरा केला. विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्या दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून अडवानी यांचे अभीष्ट चिंतन केले. "" आदरणीय अडवानीजी वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य मिळावे, अशी देवाकडे मी प्रार्थना करतो. अडवानीजी हे राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. राष्ट्राप्रती निष्ठा आणि आपल्या कामातून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे,'' असे त्यांनी आज सकाळी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. अडवानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पृथ्वीराज रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री व सर्व पक्षीय नेत्यांची रीघ लागली होती. यात गृहमंत्री राजनाथसिंह हे सर्वांत आधी पोचले होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद, संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी अडवानी यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही अडवानी यांना शुभेच्छा दिल्या.""अडवानीजी वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा दिवस आनंदमयी जाओ,'' असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आदींनी त्यांना शुभेच्छा देऊन दीर्घायुष्य चिंतले.

खास निमंत्रित पाहुणे
वाढदिवस साजरा करण्यासाठी अडवानी यांनी खास पाहुणे म्हणून दृष्टिहीन मुलांना आज निवासस्थानी निमंत्रित केले होते. घराच्या बाहेरील हिरवळीवर त्यांनी या मुलांना आपल्या हाताने मिठाई भरवली व स्वतः खाल्ली. लोधी रस्त्यावरील अंधशाळेतील 90 मुलांना अडवानी यांनी स्कूल बॅगची भेटही दिली.