इलायराजा, गुलाम मुस्तफा खान यांना पद्मविभूषण

इलायराजा, गुलाम मुस्तफा खान यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली - सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्यांपेक्षा विविध क्षेत्रांत, विशेषतः ग्रामीण भागात आदिवासी व वंचितांच्या कल्याणासाठी आयुष्यभर निरलसपणे कार्यरत राहणाऱ्या लोकसेवकांना प्रतिष्ठेचे पद्म सन्मान देण्याची परंपरा नरेंद्र मोदी सरकारने कायम ठेवली आहे. संगीतकार इलायराजा, शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्‍वरन यांचा पद्मविभूषणने गौरव करण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारीख यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे, पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे ७० वर्षीय जलतरणपटू मुरलीकांत पेटकर, गडचिरोलीतील आदिवासी बांधवांमध्ये उल्लेखनीय आरोग्यसेवा करणारे डॉ. राणी व अभय बंग, विदर्भातील दिवंगत आरोग्यसेवक संपत रामटेके, महाराष्ट्रातून सुरू झालेल्या ‘विद्यार्थ्यांसाठी टाकाऊतून टिकाऊ वैज्ञानिक खेळणी’ या संकल्पनेचे अध्वर्यू अरविंद गुप्ता यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे. 

आज रात्री उशिरा यंदाचे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. तीन जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण, तर ७३ जणांना पद्मश्रीने सन्मानीत करण्यात येणार आहे. 

अभिनेते मनोज जोशी, उद्योगपती रामेश्‍वरलाल काब्रा, चित्रपट दिग्दर्शक शिशिर पुरुषोत्तम मिश्रा, कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे डॉ. दामोदर गणेश बापट यांचा पद्मश्री विजेत्यांमध्ये समावेश आहे. 

क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याचाही पद्मभूषणने सन्मान करण्यात येणार आहे. महिला वेटलिफ्टर साईखोम मिराबाई चानू, टेनिसपटू सोमदेव देववर्मन, बॅटमिंटनपटू किदांबी श्रीकांत, सौदी अरेबियातील योगशिक्षिका नौफ मारवाई, व पश्‍चिम बंगालमधील ९९ वर्षीय समाजसेवक सुधांशू विश्‍वास यांचाही पद्मश्रीने सन्मान करण्यात येणार आहे. 

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाचे संस्कार घेऊन समाजसेवेचा वसा हयातभर जपलेले डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग हे गेली अनेक दशके ‘सर्च’ या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली व इतर भागांतील आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी मूलभूत कार्य करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी स्त्री-पुरुषांमधील व्यसनाधीनता सोडविण्यासाठी, तसेच बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉ. राणी व अभय बंग यांनी गेली अनेक दशके मोठे कार्य केले आहे. बालमृत्यूच्या समस्येवर त्यांनी विकसित केलेले ‘घरोघरी नवजात बालसेवा’ हे मॉडेल भारतासह जगातील अनेक विकसनशील व अविकसित देशांत वापरले जाते.

पेटकर यांनी भारतीय लष्करात इलेक्‍ट्रॉनिक्‍स व मेकॅनिकल अभियंता विभागात सेवा बजावली. पेटकर यांना १९६५ च्या भारत-पाक युद्धात हात गमवावा लागला होता. १९७२ च्या जर्मनी पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरणात सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेतील भारताचे ते पहिलेवहिले सुवर्णपदक होते. याच स्पर्धेत त्यांनी तीन जलतरण प्रकारांत अंतिम फेरी गाठली होती.

गुप्ता यांनी टाकाऊ व घरगुती वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी बनवून गेली चार दशके ३० हजार शाळांत त्यांचा प्रसार केला आहे. कानपूर आयआयटीतून उत्तीर्ण झाल्यावर गुप्ता यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून शिक्षणाच्या क्षेत्रात आयुष्य वाहून घेतले. यावर आधारित १९८० मध्ये दूरदर्शनवरील तरंग या प्रसिद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनी केले. अशी वैशिष्ट्यपूर्ण खेळणी बनविण्यावर त्यांनी १८ भाषांतून लघुपट बनविले असून, १२ भाषांतून त्यांची माहिती देणारे संकेतस्थळही सुरू केले.  

अन्य विजेत्यांत तमिळनाडूच्या गायिका व तब्बल १० हजार दुर्मीळ तमीळ लोकगीतांचे संशोधन व संकलन करणाऱ्या विजयलक्ष्मी नवनीत कृष्णन, गेल्या ७० वर्षांपासून किमान १५ हजार गरीब स्त्रियांची विनामूल्य प्रसूती करून त्यांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या कर्नाटकातील ९७ वर्षीय एस. नरसम्मा, गेली ४५ वर्षे योगप्रसाराचे काम करणाऱ्या तमिळनाडूतील ९८ वर्षीय व्ही. ननाम्मल, कर्नाटकात कन्नड कबीर म्हणून ख्यातकीर्त असलेले सूफी गायक इब्राहिम सुतार, आदिवासींची गोंडवाना कला जगभरात पोचविणारे मध्य प्रदेशातील भज्जू श्‍याम, केरळमध्ये हजारो गरिबांवर पारंपरिक पद्धतीने, पण वेदनारहित शस्त्रक्रिया करणारे व १९८० चया दशकात राज्यातील शस्त्रक्रियेपश्‍चात मृत्यूंचे प्रमाण ७५ टक्‍क्‍यांवरून २८ टक्‍क्‍यांवर आणणारे एम. आर. राजगोपाल, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे विश्‍वास यांनी स्वातंत्र्यानंतर मानधनाच्या वगैरे मोहात न पडता बंगदालमधील गरिबाच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केले. सुंदरबन भागात श्री. रामकृष्ण सेवाश्रमाची स्थापना करणारे विश्‍वास यांनी राज्याच्या ग्रामीण भागात गरीब मुलांसाठी विनामूल्य शिक्षण देणाऱ्या शाळा, गरिबांसाठी मोफत दवाखाने चालविले आहेत.

केरळच्या लक्ष्मी कुट्टी यांनी ग्रामीण भागात आयुर्वेदिक औषधांचा प्रसार-प्रचार करण्यात हयात खर्च केली. विंचू व सर्पदंश झालेल्या हजारो लोकांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत. त्यांनी तब्बल ५०० हर्बल औषधे बनविली आहेत. १९५० मध्ये केरळच्या आदिवासी भागातून शालेय शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

हिमाचल प्रदेशातील बौद्धि भिक्‍खू असलेले येशी धोदेन यांनी ग्रामीण व दुर्गम पर्वतीय परिसरात राहणाऱ्या आदिवासी व तिबेटी समुदायात वैद्यकीय मदतीचे भरीव कार्य केले आहे. धर्मशाला येथील मेन ते खांग वैद्यकीय रुग्णालयाचे संस्थापक असलेले धोदेन यांनी हजारो गरिबांना मोफत उपचार मिळवून दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com