पुण्याच्या महिलेस गर्भपाताची परवानगी

पीटीआय
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

गर्भात व्यंग असल्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : पुण्याच्या एका महिलेला सर्वोच्च न्यायालयाने आज गर्भपाताची परवानगी दिली. या महिलेच्या पोटात असलेल्या 24 आठवड्यांच्या गर्भाला डोक्‍याची कवटी किंवा मेंदू नसल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला.

न्यायालयाने पुण्याच्या बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय मंडळाच्या अहवालाच्या आधारावर या महिलेला गर्भपाताची परवानगी दिली. या व्यंगावर कोणताही उपाय नसल्याचे अहवालात म्हटले होते. न्यायाधीश सी. ए. बोबडे आणि न्यायाधीश एल. नागेश्‍वर राव यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आम्ही गर्भपाताला परवानगी देण्यास योग्य आणि न्यायाचे हित असल्याचे मानतो.

20 वर्षे वयाच्या या महिलेची तपासणी पुण्याच्या रुग्णालयात करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्‍टरांनी आपल्या अहवालात म्हटले होते की, भ्रूणामध्ये कवटी आणि मेंदूचा पूर्णपणे अभाव आहे आणि ते जगण्याची शक्‍यता अतिशय कमी आहे. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार यांनी खंडपीठाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांनुसार सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील गर्भपाताची अशा प्रकारची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यास सांगितले आहे.