पाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांना व्हिसा देणार: सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्‍मीरमधील व्यक्तीला भारतात उपचार घेण्यासाठी वैद्यकीय व्हिसा दिला जाईल, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज सांगितले. या त्यांच्या निर्णयामुळे पाकव्याप्त काश्‍मीर हा भारताचाच भाग असल्याचा सूचक संदेश त्यांनी पाकिस्तानला दिल्याचे मानले जात आहे.

भारताने पाकिस्तानबाबत केलेल्या नियमानुसार, पाकिस्तानमधील कोणत्याही व्यक्तीला भारतात उपचारासाठी यायचे असल्यास त्यांना पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सल्लागार सरताज अझीझ यांच्याकडून पत्र मिळविणे आवश्‍यक आहे; मात्र हा नियम पाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांसाठी लागू नसल्याचे स्वराज यांनी आज स्पष्ट केले. पाकव्याप्त काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याने येथील नागरिकांना वैद्यकीय व्हिसा मिळविण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्‍यकता नसल्याचे स्वराज यांनी ट्‌विटरवरून जाहीर केले आहे.

पाकिस्तानमधील नागरिकांना वैद्यकीय व्हिसा देण्यासाठी अझीझ यांची परवानगी आवश्‍यक असताना अझीझ हे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका स्वराज यांनी गेल्या आठवड्यात केली होती. तसेच याबाबत केलेल्या विनंतीला उत्तर देण्याचे सौजन्यही अझीझ यांच्याकडे नाही, असा टोलाही स्वराज यांनी लगावला होता.