रेल्वेगाड्यांना साहित्यकृतींचे नाव देण्याचा प्रस्ताव: सुरेश प्रभू

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेमधील प्रवासाला वैचारिक स्पर्श देण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे. यासाठी प्रसिद्ध साहित्यकृतींची नावे रेल्वेगाड्यांना देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेमधील प्रवासाला वैचारिक स्पर्श देण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे. यासाठी प्रसिद्ध साहित्यकृतींची नावे रेल्वेगाड्यांना देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

याबाबतचा निर्णय झाल्यास, संबंधित साहित्यकृतींबरोबरच त्या लेखक अथवा लेखिकेचे नाव आणि त्यांचे राज्य याची माहिती प्रवाशांना मिळू शकेल. म्हणजेच, पश्‍चिम बंगालला जाणाऱ्या रेल्वेला महाश्‍वेतादेवी यांनी लिहिलेल्या एखाद्या कादंबरीचे नाव असू शकेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासाठी रेल्वे मंत्रालय देशभरातील पुरस्कारविजेत्या साहित्यकृतींची यादी तयार करत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. "रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची ही संकल्पना आहे. रेल्वे हा भारतीयांना एकत्र आणणारा धर्मनिरपेक्ष घटक असल्याने देशाची सांस्कृतिक विविधता दर्शविण्यासाठी रेल्वेगाड्यांचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे देशभरातील विविध भाषांमधील प्रसिद्ध साहित्यकृतींची नावे रेल्वेगाड्यांना देण्याबाबत विचार सुरू आहे,' असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या साहित्यकृतींच्या यादीवर काम सुरू झाल्याने या प्रस्तावाचा प्राथमिक टप्पा रेल्वे मंत्रालयाने जवळपास पूर्ण केला आहे. भारतातील प्रादेशिक अस्मितेमुळे विविध भाषांमध्ये मोठी साहित्यनिर्मिती झाली आहे. या साहित्याची देशभरात ओळख निर्माण व्हावी आणि युवकांनाही त्याबाबत माहिती मिळावी, हा या संकल्पनेमागील हेतू आहे.

रेल्वेचालकांचा सत्कार
रेल्वे रुळावरून घसरली असताना प्रसंगावधान राखल्याबद्दल आणि अडचणीच्या काळात समर्पित भावनेने कर्तव्य केल्याबद्दल दोन रेल्वेचालकांचा आज मंत्रालयात सत्कार करण्यात आला. 29 ऑगस्टला दरड कोसळल्यामुळे नागपूर-मुंबई दुरांतो एक्‍स्प्रेसचे इंजिन आणि नऊ डबे रुळावरून घसरले होते. या वेळी वीरेंद्र सिंह आणि अभयकुमार पाल या दोन रेल्वेचालकांनी प्रसंगावधान राखत रेल्वेचा वेग नियंत्रित केल्याने शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले होते.