राहुल यांचा अमेरिका दौरा देशासाठी उपयुक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

भाजपच्या टीकेवर काँग्रेसचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी दोन आठवड्यांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले असले, तरी या दौऱ्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. राहुल यांच्या दौऱ्याची सत्ताधारी भाजपने खिल्ली उडविल्याबद्दल आक्रमक झालेल्या काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, परदेश दौऱ्यावरून राहुल यांची पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांशी तुलना करताना हा दौरा देश आणि पक्षासाठी उपयुक्त आहे, असा दावा केला आहे.

राहुल गांधींचे नेतृत्व प्रस्थापित होण्यासाठी आणि जागतिक पातळीवरील नेत्यांसमवेत त्यांचा परिचय होण्यासाठी हा दौरा असून काँग्रेस नेते व राजीव गांधींच्या काळात संगणकाचे भारतात आगमन होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे सॅम पित्रोदा यांचा राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्याच्या आयोजनात प्रमुख सहभाग आहे. एरव्ही राहुल यांच्या परदेश दौऱ्यांवरून माध्यमांसमोर नेहमी बचावात्मक भूमिकेत राहणारे काँग्रेसचे नेते ताज्या अमेरिका दौऱ्याची जाणीवपूर्वक जाहिरात करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, कृत्रिम बुद्धिमत्तेवरील परिसंवादासाठीच्या कथित सहभागावरून सोशल मीडियावर काढले जाणारे चिमटे आणि हा दौरा म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याचा सत्ताधारी भाजपकडून लगावण्यात आलेला टोला यावर काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला.

काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांच्या तुलनेत राहुल गांधींचे दौरे 0.001 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहेत. परंतु, अशा प्रकारे टीकाटिप्पणी करण्याची काही जणांना सवय लागली आहे. यावर उत्तर देण्याची आवश्‍यकता नाही. एखाद्या उच्चस्तरीय परिसंवादामध्ये एखादा नेता आपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी, भारतीयत्वाची संकल्पना, विरोधी पक्षांतर्फे भारताची बाजू मांडण्यासाठी जात असताना, त्यावर टीकाटिप्पणी करणे गैर आहे. भाजपची मंडळी यात तरबेज आहेत. मात्र, काँग्रेसला यामुळे फरक पडत नाही.

बर्कले विद्यापीठात व्याख्यान
आपल्या दोन आठवड्यांच्या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी राजकीय नेते, थिंकटॅंक, तसेच भारतीय वंशाच्या नागरिकांना भेटणार आहेत. कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात त्यांचे "70 वर्षांनंतरचा भारत' या विषयावर व्याख्यान होणार आहे. 1949 मध्ये या विद्यापीठात तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे भाषण झाले होते. या व्यतिरिक्त लॉस अँजेलिस येथे राहुल गांधी अमेरिकेतील थिंक टॅंकसमवेत चर्चा करतील. न्यूयॉर्क येथे प्रिन्स्टन विद्यापीठात भारतीय समुदायासमोर ते भाषण करतील.