'राजधानी', "शताब्दी'त गणवेशधारी कर्मचारी

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

"प्रोजेक्‍ट सुवर्ण'अंतर्गत ऑक्‍टोबरपासून बदल

नवी दिल्ली : राजधानी आणि शताब्दी या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. येत्या ऑक्‍टोबर महिन्यापासून अशा प्रकारच्या तीस रेल्वेगाड्यांमध्ये या सुधारणांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

प्रवाशांना भोजन पुरविण्यासाठी ट्रॉली, गणवेशधारी नम्र कर्मचारी आणि करमणुकीची साधणे, असे बदल तीन महिन्यांसाठी केले जाणार आहेत. यासाठी रेल्वेला 25 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या वेगवान गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, या उद्देशाने "प्रोजेक्‍ट सुवर्ण' या अंतर्गत या सुविधा केल्या जाणार आहेत. 15 राजधानी आणि 15 शताब्दी गाड्यांमध्ये हा बदल होणार आहे. ऑक्‍टोबरपासून देशभरात मोठे सणसमारंभ साजरे करण्याचा काळ असल्याने तेव्हापासूनच हा बदल होईल, असे सूत्रांनी सांगितले. वरील बदलांबरोबरच डब्यांमधील स्वच्छतेवरही मोठा भर दिला जाणार आहे. महागडी तिकिटे काढून या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करत असतानाही अस्वच्छ शौचालये, अनियमितता, गाड्यांना उशीर होणे, भोजनाचा दर्जा अशा तक्रारी येत असतात. या सर्व तक्रारींचे निवारण करण्याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाणार आहे.

प्रोजेक्‍ट सुवर्णअंतर्गत रेल्वेमधील सुरक्षा व्यवस्थाही वाढविली जाणार आहे. यासाठी रेल्वे पोलिस दलाला सज्ज राहण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाने केल्या आहेत. बदल होणाऱ्या 15 राजधानी गाड्यांमध्ये मुंबई, हावडा, पाटणा, रांची आणि भुवनेश्‍वरकडे जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच, हावडा-पुरी, नवी दिल्ली-चंडीगड, नवी दिल्ली-कानपूर, हावडा-रांची या शताब्दी गाड्यांचाही समावेश आहे.