गर्दी नसलेल्या काळात गाड्यांचे तिकीटदर घटणार

गर्दी नसलेल्या काळात गाड्यांचे तिकीटदर घटणार

राजधानी, दुरान्तो, शताब्दीबाबत रेल्वेचा दिलासा

नवी दिल्ली: राजधानी, शताब्दी, दुरान्तो रेल्वेगाड्यांच्या कंबरतोड दरवाढीने त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा देणारी योजना पीयूष गोयल-अश्‍विनी लोहाणी यांच्या रेल्वे मंत्रालयाने आणण्याचे ठरविले आहे. ऑफ सीझन काळात या गाड्यांच्या तिकिटांचे दर रिकाम्या जागांच्या गुणोत्तरी प्रमाणात घटविण्याची ही योजना आहे.

सुरेश प्रभू यांच्या काळात मागील वर्षी सप्टेंबरमध्ये प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी "फ्लेक्‍झी फेअर' तिकीट योजना लागू करण्यात आली होती. यात तब्बल 50 टक्के तिकीट वाढ झाली. याबद्दल असंतोष असल्याचे फीडबॅक पंतप्रधान कार्यालयापर्यंत जाताच या योजनेचा पुनर्विचार सुरू झाला. गोयल यांनी त्या प्रक्रियेला गती दिली. मात्र, सारी योजनाच रद्द केली तर ते बरे दिसणार नाही, या विचारातून या नव्या योजनेची मलमपट्टी विचाराधीन व प्रस्तावित करण्यात आली. रेल्वे मंडळाने नव्या योजनेचा अभ्यास केल्यावर गोयल यांनी नुकतेच याबद्दल ट्विट केले. यानुसार जेव्हा सीझन नसेल, त्या वेळी कमी होणाऱ्या प्रवासी संख्येचा व गर्दीचा अंदाज घेऊन "राजधानी'सह तिन्ही गाड्यांचे दर घटविले जातील.

धुक्‍याशी लढण्यासाठी रेल्वे मंडळाने नवी शक्कल शोधून काढली आहे. त्यानुसार रेल्वेगाड्यांच्या चालकांना धुक्‍याच्या वातावरणात सिग्नल नीट दिसण्यासाठी व त्याबद्दलची माहिती कळण्यासाठी "फॉग पायलट असिस्ट' नावाची नवी प्रणाली देण्यात येणार आहे. हे छोटेसे यंत्र सेल व ते इंजिनातच बसविले जाईल. महानगरांत ज्याप्रमाणे बसस्टॉपवर शहरातील त्या बसची येण्याची वेळ मिनिटांत येते किंवा मेट्रोची सिग्नल यंत्रणा व वेळेची गणती यांचे कोष्टक जसे जुळविलेले असते त्याच धर्तीवर ही नवी फॉग पास यंत्रणा काम करेल. मात्र, मेट्रोप्रमाणे त्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष नसेल तर या यंत्रातच गाड्यांची स्थिती लक्षात येईल. उत्तर रेल्वेने अशी 4920 यंत्रे रेल्वे इंजिनांत बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. याशिवाय आणखी 1175 यंत्रे बसविण्यात येतील. धुक्‍यातून जाणाऱ्या रेल्वेगाडीच्या चालकास 500 मीटरच्या अंतरावरच धोक्‍याचा इशारा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com