राजीव गांधींच्या क्षमतेबाबत "सीआयए' होती साशंक

rajiv gandhi
rajiv gandhi

जुन्या अहवालातील माहिती; कॉंग्रेसमधील अनागोंदीबाबतही केले होते भाकीत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन: जगभरातील राजकीय हालचालींवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकेची गुप्तहेर संघटना "सीआयए'ने (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अचानक निधन झाले तर कॉंग्रेस पक्षामध्ये राजकीय अनागोंदी माजू शकते, कारण गांधी यांच्याकडे पुरेशी राजकीय क्षमता नसल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते. 14 जानेवारी 1983 रोजी हा अहवाल तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यानंतर वर्षभरातच इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती.

राजीव गांधी यांच्या राजकीय क्षमतेबाबत "सीआयए' साशंक होती, राजीव हे पक्ष आणि जनतेवर आपला प्रभाव पाडू शकत नाहीत. राजकीयदृष्ट्याही ते पुरेसे परिपक्व नसल्याने अशा स्थितीत कॉंग्रेस राजकीयदृष्ट्या पंगू बनण्याचा धोका असल्याचे "सीआयए'च्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते. पुढे इंदिरा गांधी यांची 1984 मध्ये हत्या झाल्यानंतर पक्षाची सूत्रे राजीव गांधी यांच्याकडे आली. त्यानंतर काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकांत कॉंग्रेसला मोठे यश मिळाले होते.

इंदिराजींचा फायदाच
"इंडिया इन दि मिड-1980: गोल्स अँड चॅलेंजेस' हा अहवाल माहिती स्वातंत्र्याच्या कायद्याखाली "सीआयए'ने प्रसिद्ध केला आहे. हा कायदा भारताच्या माहिती अधिकारासारखाच आहे. या 30 पानांच्या अहवालामध्ये भारतातील 80 च्या दशकातील राजकीय स्थितीचा विविध अंगांनी विचार करण्यात आला आहे. इंदिरा गांधी या अधिककाळ सत्तेत राहिल्या असत्या तर ते राजीव गांधी यांच्यासाठी फायदेशीरच ठरले असते. पुढे पंतप्रधान म्हणून संघटना बळकट करताना राजीव यांना इंदिरा यांच्या छायेतून बाहेर पडता आले असते असेही या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे इंदिरा गांधी यांच्यानंतर पक्षातील नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी अनेक मातब्बर नेते त्याकाळी कॉंग्रेसमध्ये होते यामध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री आर. वेंकटरमण, परराष्ट्रमंत्री नरसिंह राव, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि उद्योगमंत्री नारायणदत्त तिवारी आदींचा समावेश होता. ऐनवेळी हे नेतेही पुढे आले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com