भविष्याच्या उजेडवाटांवर चालूया

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

"भारत छोडो'च्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांची भावना

"भारत छोडो'च्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांची भावना

नवी दिल्ली: "भारत छोडो' चळवळीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना धर्मनिरपेक्ष गणराज्य मजबूत करणे आणि भूतकाळाच्या अंधाराकडे नेणाऱ्या प्रतिगामी शक्तींचा बिमोड करून उज्जवल भविष्याच्या उजेडवाटांवर मार्गक्रमण करणे हे भारतीय प्रजासत्ताकाचे उद्दिष्ट व संकल्पही असावा, अशी भावना राज्यसभेत आज बहुपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. यानिमित्ताने वाढती बेरोजगारी, श्रीमंत-गरीब यांच्यात गेल्या तीन वर्षांत झपाट्याने रुंदावलेली दरी, भ्रष्टाचार, हिंदू व अल्पसंख्याकांमध्ये तेढ निर्माण करून एकाच देशात दोन भारत बनविण्याचे कारस्थान रचणाऱ्या शक्ती, जातीयवाद आदी शत्रूंना "भारत छोडो' म्हणण्याची इच्छाशक्ती प्रबळ व्हावी, असेही वक्‍त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्य चळवळीची मूल्ये जपण्याचा व एक सशक्त, विकसित, धर्मनिरपेक्ष व लोकशाही देश म्हणून भारताला घडविण्याचा निर्धार यानिमित्त मांडलेल्या ठरावातही करण्यात आला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेला "भारत छोडो'चा निर्णायक इशारा हिंदुस्थानने दिला, त्या घटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार आज संसदेत विशेष चर्चा झाली. नवनीत कृष्णन, सुखेंदूशखेर रॉय, रामगोपाल व शरद यादव, हुसेन दलवाई, रजनी पाटील, संजय राऊत, रामदास आठवले, डी. राजा, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले ए. व्ही. स्वामी आदींची भाषणे झाली.

विरोधकांचे टीकास्त्र
सभागृह नेते अरुण जेटली यांनी चर्चेला सुरवात करताना भारत हा मजबूत, आर्थिक प्रगतिशील, न्यायसंगत देश म्हणून उदयाला येण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केवळ गटारी व गल्ल्या स्वच्छ करण्याची घोषणा करून स्वच्छता होणार नाही, तर आम्हाला आमचे मन, बुद्धी व नियत हेही स्वच्छ करावे लागेल, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. येचुरी यांनी संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याचा ठराव हा कम्युनिस्ट नेत्यांनी 1921 मध्ये मांडल्याचे स्मरण करून दिले. ते म्हणाले, की क्रांतीसिंह नाना पाटील, कॅप्टन लक्ष्मी सेहगल हे कम्युनिस्ट नेते नंतर संसदेतही आले होते. अंदमानच्या कारागृहातील स्वातंत्र्यसैनिकांच्या छायाचित्रांत 80 टक्के चित्रे ही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बाहेर भाषण करा!
खासदार संख्या व वेळेची मर्यादा पाहून छोट्या पक्षांना प्रत्येकी दोन-तीन मिनिटे भाषणासाठी मिळाली. राऊत यांनी यावर आक्षेप घेताना, इतका महत्त्वाचा विषय आहे, स्वातंत्र्यलढ्यात इतके लोक हुतात्मा झाले व त्यावर केवळ तीन मिनिटे कशी, अर्धा तास तरी द्यायला हवा, असे ते म्हणाले. त्यावर कुरियन यांनी तुम्ही असे करा, बाहेर जाऊन या विषयावर अर्धा तास बोला, असा टोला त्यांना लगावताच हास्यकल्लोळ उसळला.