लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटींवर कोविंद यांचा भर

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद बुधवारी जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना श्रीनगर येथे भेटणार असून, 17 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मागणार आहेत.

नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद बुधवारी जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना श्रीनगर येथे भेटणार असून, 17 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मागणार आहेत.

कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला, तेव्हा मुफ्ती उपस्थित नव्हत्या. मात्र त्यांच्या पीडीपी पक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रपतिपदासाठीही त्यांचे मत अनुकूल आहे. कोविंद यांच्यासह केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू आणि भारतीय जनता पक्षाचे सचिव राम माधव हेही मेहबूबा यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर कोविंद गुरुवारी पंजाब व हरियाना येथील "रालोआ'च्या लोकप्रतिधींची भेट घेतील. हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. कोविंद यांच्या पंजाब व हरियाना दौऱ्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज व भाजपचे सचिव अनिल जैन हे त्यांच्यासह असणार आहेत.

आठवड्याच्या शेवटी कोविंद दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाऊन प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मागणार आहेत. दक्षिणेतील तमिळनाडू, केरळ आणि पदुच्चेरीमध्ये कोविंद "रालोआ'च्या घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींची भेट घेतील. आगामी काही दिवसांमध्ये दोन ते तीन पक्ष कोविंद यांना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा असल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले.
कोविंद यांच्यामागे जवळपास 62 टक्के मते असल्याचे सांगण्यात येत असून, भावी राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड निश्‍चित समजली जात आहे. भाजप व रालोआचे घटकपक्ष वगळता टीआरएस, वायएसआरसीपी, एआयडीएमके, बीजेडी आणि जेडी(यू) आदी पक्षांनी कोविंद यांना पाठिंबा दिल्याचे या आधीच जाहीर केले आहे.