नेहरू, इंदिरा गांधी यांचा उल्लेख का नाही केला?; काँग्रेसची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

नवी दिल्ली: नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शपथविधीमुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण असताना, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने मात्र राष्ट्रपतींच्या भाषणावर टीकेची झोड उठवली असून, आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी पंडित नेहरू, इंदिरा गांधींचा उल्लेख का केला नाही, असा प्रश्‍न केला आहे.

शपथविधी सोहळ्यानंतर काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा दिल्या. ते आता एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे राष्ट्रपती असून, देशहिताकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आझाद यांनी व्यक्त केली. मात्र पहिल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींचा नामोल्लेख टाळल्याची नाराजी बोलून दाखविली. ते म्हणाले, की पहिले पंतप्रधान स्वातंत्र्यसैनिकही होते. त्यांची कन्या आणि नातूही पंतप्रधान झाले. ज्यांनी देशासाठी बलिदान केले त्यांचे नाव घेण्यास विसरणे हे खटकणारे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे नव्हे तर जागतिक नेते होते. त्यामुळे हा प्रकार निराशाजनक आहे. काँग्रेसचे दुसरे नेते आनंद शर्मा यांनी, राष्ट्रपतींच्या भाषणातील दीनदयाळ उपाध्याय यांच्या उल्लेखाबद्दल आक्षेप घेतला. ते म्हणाले, की नव्या राष्ट्रपतींनी महात्मा गांधींसोबत दीनदयाळ उपाध्याय यांना आणून बसविण्याचा प्रयत्न केला आहे.