रसगुल्ला बंगालचाच

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

ट्‌वीट
आपल्या सगळ्यांसाठी गोड बातमी आहे. बंगालला रसगुल्ल्यासाठी जीआय मिळाल्याचा मला अभिमान आहे.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल

नवी दिल्ली : "रसगुल्ला कोणाचा' या मुद्यावरून पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा राज्यामध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादात पश्‍चिम बंगालने बाजी मारली आहे. रसगुल्लासाठी पश्‍चिम बंगालला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. यामुळे रसगुल्ला हा बंगालमध्येच शोधला गेलेला पदार्थ असल्याचे सिद्ध झाले आहे.

"जीआय'मुळे नोंदणीकृत आणि अधिकृत वापरकर्त्यालाच संबंधित उत्पादनाच्या नावाचा वापर करता येतो. ओडिशा सरकारने 2015 पासून "उल्टो रथ' महोत्सवात रसगुल्ला दिवस साजरा करण्यास सुरवात झाल्यापासून दोन राज्यांमधील वादाला सुरवात झाली होती. ओडिशा सरकारच्या म्हणण्यानुसार, रथयात्रेच्या काळात भगवान जगन्नाथ देवी लक्ष्मीला एकटे सोडत असल्याने देवी नाराज होते. त्यामुळे तिला खूश करण्यासाठी भगवान तिला रसगुल्ले देतात. ही कथा ओडिशात घडत असल्याने रसगुल्ला मूळ ओडिशाचाच असल्याचे येथील सरकारचे म्हणणे होते. मात्र, पश्‍चिम बंगालने या कथेवर आक्षेप घेतला होता. रसगुल्ला हा नासक्‍या दुधापासून तयार करत असल्याने तो "अशुद्ध' असतो आणि देवाला कधीही त्याचा नैवेद्य दाखवित नाहीत. त्यामुळे भगवान जगन्नाथाने तो देवी लक्ष्मीला देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असा दावा पश्‍चिम बंगालने केला होता.