सुनंदा पुष्कर मृत्यूच्या तपासात दिरंगाईबाबत न्यायालयाची नाराजी

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी होणाऱ्या विलंबाबत आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारणा केली. दिल्ली पोलिसांकडून होणाऱ्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत तीन वर्षांनंतरही या खटल्याचा तपास पूर्ण का झाला नाही, असा सवाल केला.

भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या तपासासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकेत सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा तपास सीबीआयच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत करावा, अशी मागणी केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायाधीश जी. एस. सिस्तानी आणि न्यायाधीश चंद्रशेखर यांच्या पीठाने म्हटले की, 2015 रोजीच्या सुनंदा पुष्कर प्रकरणातील संबंधित साक्ष आणि पुरावे गोळा झालेले असताना पोलिस अद्याप इलेक्‍ट्रॉनिक साक्षीबाबत निष्कर्षाप्रत पोचलेली नाहीत. तपासाला विलंब का होत आहे, ही बाजूदेखील तपासावी लागेल, असे कोर्टाने म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसाने तीन दिवसात तपास अहवाल सादर करण्याचे कोर्टाला सांगितले. यासंदर्भात गृहमंत्रालयाच्या वकिलाने म्हटले की, दिल्ली पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासाबाबत आम्ही समाधानी आहोत. तरीही सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे कारण समजणे गरजेचे आहे. दरम्यान, पुढील सुनावणी 30 ऑगस्टला आहे. 17 जानेवारी 2014 रोजी रात्री दिल्लीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर (वय 51) या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी शशी थरूरसह अनेकांची चौकशी झाली आहे. दिल्ली पोलिस थरूर यांचा घरगुती सहायक नारायण सिंह, चालक बजरंगी आणि मित्र संजय दिवान याची पॉलिग्राफ टेस्टदेखील केली आहे.