फॅसिस्ट शक्तींना धक्का देणारा निकाल: राहुल गांधी

फॅसिस्ट शक्तींना धक्का देणारा निकाल: राहुल गांधी

नवी दिल्ली: व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे काँग्रेसने गुरुवारी जोरदार स्वागत केले. फॅसिस्ट शक्तींना धक्का देणारा हा निकाल असल्याचा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला. पाळत ठेवून सर्वसामान्यांच्या खासगीपणावर निरंकुशपणे अतिक्रमण करण्याचा सरकारचा डाव उधळला गेल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निमित्ताने काँग्रेसने केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला. यावर प्रतिक्रिया देताना सोनिया गांधींनी म्हटले, की गोपनीयतेच्या मूलभूत हक्कावरील निकालामुळे नागरिकांचे हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेचे नवे युग सुरू झाले आहे. एवढेच नव्हे, तर सर्वसामान्यांवर पाळत ठेवून त्यांच्या जगण्यावर निरंकुशपणे अतिक्रमण करण्याचे सरकारचे प्रयत्न या निकालाने उधळून लावले आहेत. नागरिकांच्या व्यक्तिगत गोपनीयतेवर गदा आणण्याच्या विद्यमान सरकारच्या प्रयत्नांविरुद्ध अन्य विरोधी पक्षांच्या सहकार्याने काँग्रेस पक्ष, काँग्रेसशासित राज्ये संसदेत आणि न्यायालयातही खंबीरपणे उभी राहिली.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी न्यायालयाचा निकाल म्हणजे सर्व भारतीयांचा विजय असल्याचे म्हणत सत्ताधारी भाजपला फटकारले. फॅसिस्ट शक्तींना या निकालामुळे चांगलाच धक्का बसला असून, पाळत ठेवण्याच्या प्रकारातून दबाव आणणारी विचारसरणी नाकारली गेली आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी ट्विट केली.

न्यायालयाचा निकाल दूरगामी : चिदंबरम
माजी गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. न्यायालयाचा निकाल अत्यंत दूरगामी आणि आतापर्यंतच्या महत्त्वाच्या निकालांपैकी एक असल्याचीही टिप्पणी त्यांनी केली. खासगीपणा हा व्यक्तिस्वातंत्र्याचा गाभा आणि जीवनाचे अविभाज्य अंग आहे. या निकालामुळे घटनेच्या 21 व्या कलमाला नवी झळाळी मिळाली आहे. आधार कार्डवरून सरकारने पेच वाढविल्याची टिप्पणी चिदंबरम यांनी केली. आधार कार्ड देण्यात गैर काहीही नाही. परंतु, त्यासाठी सक्ती करणे चूक आहे. शाळाप्रवेश, रेल्वे किंवा विमान प्रवासासाठी आधारची सक्ती कशासाठी, असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला.

पोलिसी राज्याचे षड्‌यंत्र उधळले : सुरजेवाला
काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी, हा ऐतिहासिक आणि मार्गदर्शक निकाल असल्याचे म्हटले. तसेच, जनतेवर पाळत ठेवून पोलिस राज्य बनविण्याचे षड्‌यंत्र यामुळे उधळले गेले असून, सत्ताधाऱ्यांना चपराक मिळाली आहे, असा टोला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com