देशातील 20 विद्यापीठांना दहा हजार कोटी

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

पंतप्रधान मोदींची घोषणा; गुणवत्तेच्या आधारावर निधीवाटप

पंतप्रधान मोदींची घोषणा; गुणवत्तेच्या आधारावर निधीवाटप

पाटणा: केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत भारतीय विद्यापीठांनी जागतिक पातळीवरील आघाडीची विद्यापीठे बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 20 आघाडीच्या विद्यापीठांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या महागुंतवणुकीच्या माध्यमातून ही विद्यापीठे जागतिक दर्जाची बनविण्याचा सरकारचा विचार आहे. पाटणा विद्यापीठाच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली. या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान आदी मान्यवरदेखील उपस्थित होते.

दहा सरकारी आणि दहा खासगी क्षेत्रातील विद्यापीठे जागतिक दर्जाची बनविण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने निवडलेल्या 20 विद्यापीठांना सरकारी कक्षेच्या बाहेर जाऊन काम करता येईल. येथे त्यांना सरकारी नियम अडसर ठरणार नाहीत, असे मोदी यांनी सांगितले. तत्पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या भाषणामध्ये पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याची विनंती पंतप्रधानांना केली होती. हाच धागा पकडत मोदी म्हणाले, की पाटणा विद्यापीठास केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला जावा ही मागणी जुनी आहे. या दर्जाऐवजी पाटणा विद्यापीठाने देशभरातील खासगी आणि सरकारी विद्यापीठांशी स्पर्धा करावी, त्यामुळे आपसूकच विद्यापीठाचाही विकास होईल.

केवळ गुणवत्तेचा विचार
गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या आधारावर 20 विद्यापीठांची निवड करून त्यांना जागतिक दर्जाची ज्ञानकेंद्रे बनविण्यात येतील. यासाठी संबंधित विद्यापीठांची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, जागतिक दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले काम आणि अन्य बाबींचा येथे विचार केला जाईल. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने जरी यासाठी शिफारस केली तरीसुद्धा ती ग्राह्य धरली जाणार नाही. सरकारव्यतिरिक्त तिसरा घटक विद्यापीठांची निवड करेल, असेही मोदी यांनी नमूद केले.

चांगली विद्यापीठे विद्यार्थी घडवितात
युवा पिढीस विद्यापीठेच घडवतात. चांगल्या विद्यापीठांमधून बाहेर पडलेले विद्यार्थी सांस्कृतिक विकासामध्येही मोलाचे योगदान देतात, असे सांगतानाच मोदी यांनी विद्यापीठांना केंद्रीय दर्जा देण्याची मागणी जुनी असल्याचे सांगितले. या क्षेत्रात आमच्या सरकारने एक पाऊल पुढे टाकत विद्यापीठांना प्रोफेशनल बनविण्याची दारे उघडली आहेत. यामुळे केवळ विद्यापीठांतील शैक्षणिक गुणवत्तेमध्येच सुधारणा होणार नाही, तर लोकांच्या समस्यांचेही निराकरण केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

"स्टार्टअप'चाही उल्लेख
युवकांमधील उद्यमशीलतेस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या "स्टार्टअप इंडिया' या योजनेचाही मोदींनी आवर्जून उल्लेख केला. विद्यापीठांकडून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे ही उद्यमशीलता वाढीस लागेल, असेही त्यांनी सांगितले. "स्टार्टअप प्रोजेक्‍ट'मध्ये भारत चौथ्या स्थानी असल्याची बाबही मोदींनी मांडली. या कार्यक्रमानंतर मोदींनी बिहार संग्रहालयास भेट देऊन त्याची पाहणी केली. हे संग्रहालय नितीश यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' म्हणून ओळखले जाते.