वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीने दिल्ली ठप्प
नवी दिल्ली: नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीची सुटी साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या उत्साही दिल्लीकरांनी राजधानीतील वाहतूक आज अक्षरशः ठप्प केली. प्रसिद्ध इंडिया गेट परिसरात तब्बल लाखभर नागरिकांनी सुटी घालवली. या प्रचंड गर्दीमुळे ठप्प झालेली वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली होती.

मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत दिल्लीत जल्लोषात झाले. मात्र वर्षारंभाला मिळालेल्या सुटीचा आनंद घेण्यासाठी दिल्लीकरांनी आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांनी दाखविलेल्या उत्साहाचा फटका वाहतुकीला बसला. ऐन थंडीत दाट धुक्याची चादर पांघरलेल्या दिल्लीत नागरिकांनी इंडिया गेट परिसरात धाव घेतली. इंडिया गेट, राजपथ, विजय चौक आणि राष्ट्रपती भवनाचा परिसर तर गर्दीने ओसंडून वाहत होता.
या उत्साही नागरिकांची झुंबड आणि वाहनांच्या रांगांमुळे वाहतूक नियंत्रण करणे पोलिसांना अवघड झाले होते. अखेर, पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इंडिया गेट परिसरात झालेल्या गर्दीची माहिती देताना या भागात येण्याचे टाळावे, असाही सल्ला दिला. इंडिया गेट भागात सुमारे लाखभर लोक जमा झाल्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या असून, पार्किगसाठी जागा नाही. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे पोलिसांना सांगावे लागले. व्यावसायिक केंद्र असलेल्या कॅनॉट प्लेस भागात, हनुमान मंदिर परिसरातही गर्दीमुळे वाहतुकीची वाईट अवस्था होती. याच भागाला लागून असलेल्या लोधी रोड, अशोक रोड, संसद मार्ग, अकबर रोड, राजेंद्र प्रसाद रोड, त्याचप्रमाणे निजामुद्दीन ब्रिज, रिंगरोड, प्रगती मैदान या भागात वाहतुकीची दारुण अवस्था होती.