बनावट कंपन्यांची दोन लाख बॅंक खाती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

नोटाबंदीनंतर आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत उघड ; कंपन्या रजिस्टरमधून रद्द

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर विविध खात्यांमधील संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत एकूण दोन लाख नऊ हजार 32 कंपन्यांची खाती बॅंकांमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर या सर्व कंपन्या कंपनी रजिस्टरमधून रद्द करण्यात आल्या आहेत. या प्रामुख्याने शेल (बनावट) कंपन्या असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली. या कंपन्यांच्या खात्यांच्या माध्यमातून सुमारे 4552 कोटी रुपयांची रक्कम नोटबंदीनंतर काढून घेण्यात आल्याचे आढळून आले आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर तेरा बॅंकांनी दोन लाखांहून अधिक संशयास्पद कंपन्यांची माहिती दिल्यानंतर या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. परंतु, त्यांच्या कर्जफेडीपुरते त्यांचे अस्तित्व मर्यादित राखण्यात आले आहे. बॅंकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेल कंपन्यांची संख्या दोन लाखांहून अधिक असली तरी प्रत्यक्षात मूळ कंपन्यांची संख्या 5800 असल्याचे व त्याची प्रत्यक्षातील खाती 13,140 असल्याचे आढळून आले. यावरूनच खोट्या कंपन्या उभारून बेहिशोबी पैशाची उलाढाल करण्यात आल्याची बाब निष्पन्न होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यातील चकित करणारा भाग म्हणजे एका कंपनीची 2134 खाती असल्याचे चौकशीत प्रकाशात आले. काही कंपन्यांची 100, काहींची 900, काहींची 300 अशी खात्यांची संख्या आढळून आली. आता ही सर्वच खाती गोठविली गेली आहेत. वरील माहिती देऊन केंद्र सरकारने नोटबंदीद्वारे काळा पैसा उघडकीस कसा आला हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः सध्या सरकारवर जो टीकेचा भडिमार होऊ लागला आहे, त्यामुळे ही माहिती देऊन त्याला प्रत्युत्तर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

नोटाबंदीनंतर उलाढाल
नोटाबंदीनंतर बनावट कंपन्यांच्या खात्यांतून झालेल्या उलाढालीची माहितीही बॅंकांनी सादर केली आहे. कर्जखाती वगळता या कंपन्यांच्या खात्यांवर केवळ 22.05 कोटी रुपयांची रक्कम (8 नोव्हेंबर 2016पर्यंत) होती. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर या कंपन्यांमार्फत या खात्यांमध्ये 4573.87 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आणि त्यातून 4552 कोटी रुपये काढून घेण्यात आले. एका खात्यात नोटाबंदीनंतर 11 कोटी रुपये भरून पुन्हा काढून घेण्यात आले आणि केवळ 42 हजार रुपयांची रक्कम खात्यात शिल्लक ठेवण्यात आली. अन्य एका बॅंकेत अशा तीन हजार कंपन्यांची अनेक खाती होती. या खात्यांमध्ये नोटाबंदीच्या दिवसांपर्यंत एकंदर 13 कोटी रुपयांची रक्कम होती आणि नोटबंदीनंतर 3800 कोटी रुपयांचा भरणा आणि तेवढीच रक्कम काढून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Web Title: new delhi news Two million bank accounts of counterfeit companies

टॅग्स