देशभरात विजेवर चालणाऱ्या बसेस घ्या- नितीन गडकरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

संबंधित परिवहन संस्थांनी योग्य प्रस्ताव केंद्रीय परिवहन खात्याकडे सादर करावेत. अशा प्रस्तावांना परिवहन मंत्रालयाकडून आर्थिक मदत केली जाईल. असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी देशभरातील ५४ राज्य परिवहन व महामार्ग परिवहन महामंडळांनी येथून पुढे प्रवासी सेवेसाठी इलेक्ट्रिक बसेस घ्याव्यात. तसेच सदर बसेस चालविण्याचा खर्च कमी असल्याने प्रवाशांना कमी तिकीट दरात प्रवास करणे शक्य होईल. तरी  संबंधित परिवहन संस्थांनी योग्य प्रस्ताव केंद्रीय परिवहन खात्याकडे सादर करावेत. अशा प्रस्तावांना परिवहन मंत्रालयाकडून आर्थिक मदत केली जाईल. असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

केंद्रीय परिवहन मंत्रालय, सीआयआय, फिक्की यांच्या संयुक्त विद्यमानाने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या भारतीय एकात्मिक वाहतूक आणि दळणवळण परिषदेत ते बोलत होते. या निमित्ताने नवी दिल्ली येथे विज्ञान भवनाच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या प्रदर्शनातील महाराष्ट्र शासनाच्या दालनास नितीन गडकरी यांनी भेट दिली. त्यांच्या सोबत ' विमान वाहतूक मंत्री गजपती राजू उपस्थित होते.

यावेळी एसटी महामंडळाच्या दालनाचे विशेष कौतुक केले. एस.टी.ने सुरू केलेली अपघात सहायता निधी योजना, शिवनेरी बस सेवा या बद्दल मंत्री महोदयांनी समाधान व्यक्र केले. तसेच भविष्यात महाराष्ट्रातील १३ ठिकाणी विकसित होत असलेल्या बसपोर्टच्या प्रकल्पाबद्दल जाणून घेतले. यावेळी उपस्थित असलेल्या एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती दिली.