भाजपमध्ये बाहेरच्यांना सहा महिन्यांसाठी 'प्रवेशबंदी'

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाने बाहेरच्यांना पक्षात प्रवेशबंदी केली आहे. ही बंदी किमान सहा महिन्यांसाठी असेल.

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाने बाहेरच्यांना पक्षात प्रवेशबंदी केली आहे. ही बंदी किमान सहा महिन्यांसाठी असेल.

एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. इतर कोणत्याही राजकीय पक्षांतून भारतीय जनता पक्षात कोणालाही प्रवेश देवू नये, असे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत. हे आदेश राज्य आणि जिल्हा पातळीवरील भाजपच्या सर्व शाखांना देण्यात आले आहेत. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे इतर पक्षातील नेते भाजपच्या संपर्कात असून स्थानिक नेत्यांकडे भाजपमध्ये सामावून घेण्याची मागणी करत आहेत. प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगर पालिकांमधील सदस्यांचा समावेश आहे. जे लोक इतर पक्षांकडून निवडणुका लढले आणि ज्यांना पराभवाला सामोरे जावे लागले अशा नेत्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

'पुढील सूचना मिळेपर्यंत भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. सामान्य नागरिक मिस्ड कॉलद्वारे भाजपचे सदस्य होऊ शकतात. मात्र इतर पक्षांचे पदाधिकारी प्रवेश करू शकणार नाहीत', अशी माहिती भाजपचे प्रवक्ते चंद्र मोहन यांनी दिली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर इच्छुकांची संख्या वाढल्याचेही त्यांनी सांगितले.