लंडनमधील हल्ल्यात भारतीय जखमी नाही- स्वराज

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय नागरिकांनी मदतीची गरज भासल्यास दुतावासाशी संपर्क करावा.

नवी दिल्ली - लंडनमध्ये ब्रिटीश पार्लमेंटसमोरील प्रसिद्ध वेस्टमिन्स्टर ब्रिजवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांमध्ये व जखमींमध्ये भारतीय नागरिकाचा समावेश नसल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. या हल्ल्यात 5 जण ठार झाले असून, 40 जण जखमी आहेत.

सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी लंडनमधील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. भारतीय नागरिकांना घटनास्थळी जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय नागरिकांनी मदतीची गरज भासल्यास दुतावासाशी संपर्क करावा.

ब्रिटीश वेळेनुसार दुपारी 2.40 वाजता हा हल्ला झाला. करड्या रंगाच्या ह्युंडाई आय 40 कारने अचानक पादचाऱयांच्यादिशेने मोर्चा वळवला आणि लोकांना गाडीखाली चिरडण्यास सुरूवात केली. संसदेसमोरील रेंलिगला धडकून कार थांबली. त्यानंतर संसदेच्या गेटच्या दिशेने एक व्यक्ती हातात चाकू घेऊन धावत सुटली. त्या व्यक्तीने एका पोलिसावर हल्ला चढविला. दरम्यानच्या काळात अन्य पोलिसांनी सावध होत हल्लेखोरावर गोळ्या झाडल्या. त्यात हल्लेखोर जागीच ठार झाला.

Web Title: No report of any Indian casualty in London terror attack near UK Parliament: Sushma Swaraj