राष्ट्रपतिपदासाठी एकमताने उमेदवार निवडीचा गैरभाजप पक्षांचा प्रयत्न

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

गैरभाजप पक्षांना एकत्र करून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार निवडणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र राष्ट्रपतिपदाची जुलैत निवडणूक असल्याने अद्यापही पुरेसा वेळ आहे. हे सर्व पक्ष एकत्र आल्यानंतर ते आपला उमेदवार ठरवतील, असे यादव म्हणाले.

वडोदरा - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी गैरभाजप पक्ष एकमताने उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी आज येथे केले.

गैरभाजप पक्षांना एकत्र करून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार निवडणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र राष्ट्रपतिपदाची जुलैत निवडणूक असल्याने अद्यापही पुरेसा वेळ आहे. हे सर्व पक्ष एकत्र आल्यानंतर ते आपला उमेदवार ठरवतील, असे यादव म्हणाले; मात्र अद्याप पक्षांनी कोणाच्याही नावावर चर्चा करण्यास सुरवात केलेली नाही.

यादव यांचे काल रात्री उशिरा येथे आगमन झाले. आज सकाळी ते वघोडीया गावात संयुक्त जनता दलाच्या वतीने आदिवासींच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आयोजित केलेल्या "सामाजिक न्याय मेळाव्या'साठी ते रवाना झाले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने मिळविलेल्या यशानंतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची एकी असण्याची जरुरी निर्माण झाली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचा एकच उमेदवार असावा, यासाठीची शक्‍यता तपासण्यासाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी नुकतीच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, तर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बिहारप्रमाणेच "महागठबंधन' निर्माण करण्याच्या आवश्‍यकतेवर भर दिला होता. भाजपशी टक्कर देण्यासाठी स्थानिक पक्षांची मोठी एकजूट आवश्‍यक असल्याचे मत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच व्यक्त केले होते.