रॉबर्ट वद्रांच्या आईसह 13 जणांची सुरक्षा काढली

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

रॉबर्ट वद्रा यांच्या आई मौरीन वद्रा, केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सध्याचे संचालक अलोक कुमार वर्मा यांच्यासह अन्य 13 जणांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या आईसह अन्य 13 व्हीव्हीआयपी नागरिकांची सुरक्षा काढून घेत असल्याचे दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट वद्रा यांच्या आई मौरीन वद्रा, केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सध्याचे संचालक अलोक कुमार वर्मा यांच्यासह अन्य 13 जणांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. सहा पोलिस कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सतत हजर असायचे. राजधानीतील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज असल्याने या व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील या 13 जणांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस प्रवक्ते अंबिका दास, मनीष चंद्रा, मंजुला वर्मा, हरीश चौहान, विद्या धर, व्ही. एन. सिंग या नावांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांकडून सध्या 464 व्हीव्हीआयपींना सुरक्षा पुरविली जाते. यातील 42 जणांना झेड प्लस, 60 जणांना झेड कव्हर, 72 जणांना वाय, 154 जणांना वाय पोझिशनल आणि 78 जणांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात येते.