हा माझा भारत नाही; ए. आर. रेहमान यांची खंत

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

गौरी लंकेश यांच्या हत्येमुळे मला खूप दुःख झाले. मी आशा करतो, की भारतात अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तो माझा भारत नसेल. मला वाटतेय की माझा देश प्रगतीशील आणि दयाळू असावा.

नवी दिल्ली - ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर दुःख व्यक्त करत हा माझा भारत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

वंदे मातरम्, माँ तुझे सलाम या सारखे देशभक्तीपर गीत गाणारे संगीतकार रेहमान यांनी उद्विग्नपणे ही प्रतिक्रिया दिली आहे. बंगळूर येथे पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशभर संताप व्यक्त होत असताना रेहमान यांनीही अशा घटना भारतात घडत असतील तर हा माझा भारत नसल्याचे म्हटले आहे. रेहमान हे 'वन हार्टः द ए. आर. रेहमान कन्सर्ट फिल्म’ या आगामी चित्रपटाबद्दल ते एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

रेहमान म्हणाले, की गौरी लंकेश यांच्या हत्येमुळे मला खूप दुःख झाले. मी आशा करतो, की भारतात अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तो माझा भारत नसेल. मला वाटतेय की माझा देश प्रगतीशील आणि दयाळू असावा.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर फक्त रेहमान यांनीच नाहीतर बॉलिवूडमधूनही संताप व्यक्त करण्यात आला होता. स्वरा भास्कर, जीशान अय्यूब यांनीही तीव्र प्रतिक्रिया नोंदविली होती.