स्मृती इराणींच्या शिफारसीला मोदींचा नकार

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जुलै 2016

नवी दिल्ली - मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्यात आल्यानंतर आता स्मृती इराणींनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदासाठी सुचविलेल्या नावालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नकार देण्यात आला आहे.

 

नवी दिल्ली - मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्यात आल्यानंतर आता स्मृती इराणींनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदासाठी सुचविलेल्या नावालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नकार देण्यात आला आहे.

 

पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मनुष्यबळ विकास खाते इराणी यांच्याकडून काढून घेत त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे इराणी यांना धक्का दिल्याचे बोलले जात होते. आता पंतप्रधान मोदी यांनी इराणींना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. इराणी यांनी सीबीएसई अध्यक्षपदासाठी शिफारस केलेले नाव मोदींनी नाकारले असून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या (एसीसी) कारभारात हस्तक्षेप न करण्यास सांगितले आहे.

 

इराणी यांनी सीबीएसईच्या अध्यक्षपदासाठी डॉ. सर्वेंद्र विक्रम बहादूर सिंग यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडून केंद्रीय मनुष्यबळ खात्याला पाठविण्यात आलेल्या पत्रात सीबीएसईच्या अध्यक्षपदाची जागा केंद्रीय कर्मचारी निवड योजनेद्वारे (सीएसएस) भरण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. डिसेंबर २०१४ पासून ‘सीबीएसई’ला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. शिक्षणक्षेत्रातील किमान तीन वर्षांच्या कामाचा अनुभव असलेल्या संयुक्त सचिव पदावरील व्यक्तीचा या पदासाठी विचार केला जातो.