'बाबरी'तील पक्षकार हाशिम अन्सारी यांचे निधन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

अन्सारी हे 22-23 डिसेंबर, 1949 मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तूमध्ये मुर्ती ठेवण्यात आल्यानंतर अन्सारी हेच पहिले पक्षकार होते.

अयोध्या - अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात मुस्लिमांची बाजू मांडणारे सर्वांत जुने पक्षकार हाशिम अन्सारी (वय 96) यांचे आज (बुधवार) पहाटे निधन झाले. 

हाशिम अन्सारी यांनी फैजाबादमधील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. अन्सारी हे 22-23 डिसेंबर, 1949 मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तूमध्ये मुर्ती ठेवण्यात आल्यानंतर अन्सारी हेच पहिले पक्षकार होते. अन्सारी हे 1959 पासून बाबरी मशीदप्रकरणी मुस्लिमांच्या बाजूने लढत होते. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यांना 8 महिने कारागृहात काढावे लागले होते. अयोध्येत आंदोलनादरम्यान तणाव असताना लोकांना शांततेचे आवाहन करणारे अन्सारी यांना हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तितकाच सन्मान मिळत होता.

अन्सारी यांनी अनेकवेळा न्यायालयाबाहेर जाऊन हिंदू धर्मगुरुंची भेट घेऊन हा मुद्दा मिटविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. बाबरी प्रकरणाचे राजकारण करण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या अन्सारी यांनी 2014 मध्ये हा खटला न लढवण्याची घोषणा केली होती.